You are currently viewing होडावडे चावडी एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण

होडावडे चावडी एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण

*🚩होडावडे चावडी एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण🚩*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिलल्यांच्या माहितीची पुस्तके वाचत असताना *होडावडे चावडी* बाबत दोन तीन ठिकाणी उल्लेख आढळला. त्यामुळे ही चावाडी अस्तित्वात आहे का याबाबत कुतूहल निर्माण झाले. सोमवारी योगायोगाने होडावडे येथील श्रीधर दळवी व राजा दळवी यांची भेट झाली. त्यांच्याकडून समजले की तसे ठिकाण आहे परंतु आता ते झाडीझुडुपांमुळे दिसत नाही. त्या भागात अनेक बांधकामे आहेत.
रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी मी व माझे मित्र शिवाजी परब होडावड्याचे दिशेने मार्गस्त झालो. चंद्रकांत दळवी यांनी आम्हाला त्या ठिकाणी नेले. त्यांना मी वाचलेल्या माहिती बाबत सांगितले असता त्यांनी सदर जागेबाबत त्यांना माहिती असलेली माहिती विविध बांधकामे आम्हाला दाखवली. चावडीचे ठिकाण तसेच त्या बाजूला असलेली स्मारके यांचे बांधकाम सुस्थितीत आहे. आजूबाजूला वाढलेल्या झाडीमुळे या वास्तू काहीशा झाकोळलेल्या होत्या. त्यानंतर काकांनी आम्हाला चावडीच्या चाळ्याचे ठिकाण दाखविले हे ठिकाण ६१ गुंठ्याचे आहे असे त्यांच्याकडून समजले. त्या ठिकाणचे बांधकाम पाहता त्याठिकाणी पूर्वीच्यावेळीची सदर अथवा राजवाडायचे ठिकाण असावे असे वाटते. या ठिकाणी चावडी असे वर्णन येत असले तरी येथे त्याकाळी कोट असण्याची शक्यता वाटते. याबाबत खरोखर संशोधन होणे गरजेचे वाटते.
माझ्या वाचनात आलेले शिवलंका सिंधुदुर्ग या श्री रामेश्वर सावंत लिखित पुस्तकातील एका पानावरचे होडावडे चावडी बाबत काही लिखाण आढळते ते खालीलप्रमाणे आहे.
यादवांच्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेस इ.स. १३६६ साली विजयानगरचे एक हिंदू राजघराणे उदयास आले. यांचा अंमल त्यापुढे दोन शतके टिकून होता. इ.स. १३४६ मध्ये कोंकण प्रांत विजयानगरच्या माधव मंत्र्याने जिंकून घेतला. मात्र त्याने पूर्वीचेच या प्रदेशातील शिलाहारांचे व काही ठिकाणी यादवांचे असलेले अधिकारी-सरदार दूर केले नाहीत. चंद्रभान- सुर्यभान नावाचे पराक्रमी बंधू या प्रांतावर होते ते या माधवाचे अंकित झालेत. यांनीच नंतर कुडाळ-सोनवडे पीठ येथील श्री मद्विद्यापुर्णानंद (माधवमंत्र्याचे गुरुबंधू) यांनी स्थापिलेल्या मठास (इ.स. १३३५) गावगन्ना उत्पन्न लावून दिले होते. बेदरच्या बहामनी वजीर महमंद गवाण याने कोंकणावर केलेली १४६९ ते १४७३ मधील स्वारीच्यावेळी (इतिहास प्रसिद्ध ‘तांब्रांची’ स्वारी) कुडाळ प्रांत या विजयानगरच्या अंमलाखाली होता. यावेळी चंद्रभान-सुर्यभानचे वंशज विजयानगरकरांतर्फे या प्रांतांवर अधिकारी होते. याकाळात कुडाळ आणि गोवा या दरम्यानच्या प्रदेशाला ‘माधवरायाचा पट्टा’ असेही म्हणत. यांचा कुडाळ प्रांतावरील मुख्य अधिकारी सावंत दळवी हा चंदगड येथे राहून त्याचे ठाणेदार आंबोली, भिमगड व होडावडे येथे राहायचे. प्रांताच्या वसुलीसाठी नायक व देशक या नावाचे देसाई ठिकठिकाणी होते. (साधारण १० ते १२ गावांवर एक नायक असे. आदिलशाहीत हेच नायक तर्फेवरील नायकवडी झालेत. अशा काही नायकांवर एक देशक असे. हेच देशक पुढे देसाई झालेत. तर्फ हवेली व पाट या दोन तर्फावर चंद्रभान-सूर्यभानचे घराणे देशक म्हणून होते. तर्फ तळवडे, आजगाव व माणगाव या तर्फावर *होडावडे येथील देसाई देशक होते व या सर्व दक्षिण कुडाळ प्रांतावर *होडावडेकर सावंत दळवी* चांदगडाधिपतीच्या वतीने सर्वाधिकारी होता.)
आकेरीचा नरेंद्र डोंगर आणि होडावडे-मठ गावचा वाघेरीचा डोंगर यांमधील ‘तळवड्याची खिंड’ ही गोवे प्रांताचे उत्तर-महाद्वार समजले जाई. महंमद गवाणास गोव्यात शिरण्यापूर्वी कुडाळातील विजयानगरच्या सैन्याचा प्रतिकार मोडून काढावा लागला. महामंत्री श्री माधवाचार्याच्या इ.स. १३४५ च्या स्वारीपासून या कुडाळ प्रांताची व्यवस्था सावंत दळव्यांकडे होती. *होडावड्याच्या चावडीवर महंमद गवाण व सावंत दळवी यांत तुंबळ युध्द झाले.* यावेळेस येथील स्थानिक गोमजी आदी गौडब्राम्हणांनी देशमुखीच्या अपेक्षेने महमंद गवाणास मदत केली. कोंकणचा राजा शंकरराय व इतर सरदारांस जिंकून गवाणाने अल्पावधीतच गोवे बेटावरही कब्जा केला. कुडाळ प्रांत बहामनीच्या अंमलाखाली आणून या प्रांताची व्यवस्था महंमद गवाणाने त्याला या स्वारीत मदत करणाऱ्या गौड ब्राम्हणप्रभू कुडाळ देशकरांकडे दिली. (यावेळी दळवी-सावंतांनी कुडाळ प्रांतातून आपले अधिकार गमविलेत; ते पुढे आदिलशाहीत पुन्हा संपादन केलेत.) या प्रभू कुडाळ देशकरांनी इथूनच आपला “रामजी इब्न गोमजी अल् अब्द इगिलानी” असा प्रातिनिधिक शिक्का तयार केला.
विजयनगरकर आणि बहांमनी यांच्यात सतत चाललेल्या रणकंदनामुळे या कुडाळ-कोंकण प्रांतातील प्रभुदेसाई आणि सावंत-दळवी यांच्यातील वैमनस्य वाढतच राहिले. प्रभूदेसाईंनी सावंताना कुडाळ प्रांत मिळू दिला नाही. तर सावंतांनी प्रभुदेसाईंना रांगणागडाच्या दक्षिणेकडे केव्हा फिरकू दिले नाही. त्यामुळे या दोन पक्षातील *होडावडे चावडीला* त्याकाळी जास्त महत्त्व प्राप्त झाले होते.
माधव कदम यांच्या पुस्तकात एक छोटे कथानक आढळते. इ.स.१६१७ मध्ये कुडाळच्या किल्ल्यात जोगन प्रभू हे खेमसावंताच्या बरोबर लढत असताना मारले गेले. त्यावेळी त्याची मोठी बायको सती जावयास निघाली. सती समारंभाल बरेच लोक उपस्थित होते. त्यात कुडाळ देशस्थ प्रभू जातीचीही मंडळी होती. सती जाण्याची सर्व तयारी झाल्यावर जोगत प्रभूची सती जावयास निघालेली पत्नी कुडाळ देशस्थ प्रभू राजघराण्याचे सर्व शिक्के हातात घेऊन सती शिळेवरुन मोठ्याने म्हणाली, “कोण कुडाळ देशकर हे राजघराण्याचे शिक्के सांभाळण्यास तयार आहे काय? तिने तीन वेळा अशी विचारणा केली. परंतू कोणीही कुडाळ देशकर ब्राम्हण ते शिक्के घेण्यास पुढे आला नाही. त्यावेळी ती सती शापवाणी उद्‌गारली, ‘कुडाळातून कुडाळ देशकर आजच नष्ट झाले काय? नष्ट झाले नसतील तर यापुढे होवोत.’ ही शापवाणी उच्चारुन त्या सतीने कुडाळ देशकरांचा जवळच असलेला सेनापती दळवी यास समोर बोलाविले व त्याच्या हाती ते शिक्के व नारळ दिला. आणि म्हणाली, ‘हे शिक्के तू सांभाळ व ज्यावेळी तुझा नाईलाज होईल तेव्हा बोंब मार आणि हा नारळ फोड म्हणजे ईश्वर तुझ्यावरील संकट दूर करील’ असे म्हणून, तिने श्रीदेव नारायण व पंचमहाभुते आणि सभ्यजनांस वंदन करुन अग्नीप्रवेश केला.
सेनापती दळव्यांच्या हाती कुडाळ देशस्थ प्रभूच्या राजघराण्याचे देशमुखीचे शिक्के गेले. हे पाहताच खेमसावंतानी त्याचा पाठलाग केला व त्यास झाराप येथे ‘पण्डूच्या पाथरी’ नावाचे जे आज खडक म्हणून ओळखले जातात त्या ठिकाणी गाठले. तेव्हा सतीच्या आज्ञेप्रमाणे सेनापती दळवी याने बोंब मारुन तो नारळ फोडला. क्षणार्धात लक्षावधी गांधील माशा निर्माण होऊन त्यांनी खेम सावंताच्या सैन्यास जर्जर करुन सोडले. ते पाहून खेम सावंतानी दळव्यांशी तहाचे बोलणे केले व दळवीला आपला सेनापती बनवले. या कथेला दळवी काकांनी दुजोरा दिला तसेच होडावडे चावडीच्या चाळ्याचे देवपान करताना ही बोंब मारण्याची प्रथा अजूनही सुरु असल्याचे त्यांच्याकडून समजले.
नवीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नवीन ऐतिहासिक ठिकाण बघायला मिळाले याचे समाधान परतताना मनात वाटले. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे या ठिकाणाच्या स्वच्छतेच्या मोहिमेचे आयोजन लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणाबाबत आपल्या अधिक माहिती मिळाल्यास आम्हाला नक्की संपर्क करावा. या ऐतिहासिक ठिकाणापर्यंत पोहचण्यास मदत करणारे राजा दळवी, श्रीधर दळवी व चंद्रकांत दळवी यांचे आभार 🙏🏻

🚩गणेश नाईक
📱९८६०२५२८२५
🚩दुर्ग मावळा परिवार🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा