– नगराध्यक्ष महेश कांदळगावकर
मालवण
मालवणात विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. १ हजार ७५५ व्यक्तींवर कारवाई करत तब्बल ३ लाख ६७ हजारांचा दंड १२ डिसेंबरपर्यत वसूल करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
जास्तीत जास्त दंड वसुली हे पालिकेचे उद्दिष्ट नसून सर्वांनी मास्क वापराची प्रभावी अंमलबजावणी करावी हाच आपला प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे मास्क वापराबाबत जनजागृतीही केली जात असून ज्यांच्याकडे मास्क नाहीत त्यांना पालिकेकडून मास्कही दिले जात आहे. कोरोना नियंत्रणात आला तरीही आता खरा कसोटीचा काळ आहे. जिल्ह्यात पुन्हा नवे रुग्ण सापडू लागले आहेत. नागरिकांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. येत्या काळात ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण वाढणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. अन्यथा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत शहरात विनामास्क १ हजार ७५५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ३ लाख ६७ हजार २०० दंड वसूल करण्यात आला आहे. कमीत कमी १०० रुपये स्वरूपातील दंड पावती सर्वाधिक व्यक्तींवर करण्यात आली आहे.
शहराचे प्रमुख प्रवेश मार्ग असलेल्या भरड नाका येथे कारवाईसाठी पालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात असतात. त्यासोबत बाजारपेठ, रॉक गार्डन, समुद्रकिनारा या मार्गावर फेरी असते. अपुऱ्या कर्मचारी संख्येचा विचार करता पालिकेला सगळीकडे कर्मचारी तैनात करणे शक्य नाही. त्याचा विचार करता व्यापारी वर्ग, अन्य छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, वाहनचालक यांनीही विनामास्क फिरणाऱ्या पर्यटक अथवा नागरिकांना मास्क लावण्याबाबत आवाहन करावे. पालिकेकडून जनजागृती, फलकद्वारे जागृती सुरू आहे. त्यासोबत आपल्या सर्वांचेही जनजागृतीत योगदान अपेक्षित आहे. आपल्या सर्व मालवणवासीयांच्या सहकार्याने, कोरोना खबरदारी नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शहर काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त झाले होते. मात्र काल शहरात नव्याने ३ रुग्ण सापडून आले. मात्र आपण घेत असलेली काळजी आदर्शवत अशीच असून यापुढेही मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छता याचा प्रभावी वापर करून मालवण शहर कोरोनामुक्त करूया.असे आवाहनही श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.