You are currently viewing ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रकल्प, अभियान शासनामार्फत राबविले जातात. या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, यांच्या विद्यार्थ्यांसाठीच्या संदेश पत्राचे वाचन जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी दि. ०१.०१.२०२४ रोजी करून अभियानाची सुरवात केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियाना अंतर्गत दि.०१ जानेवारी २०२४ ते दि. १५ फेब्रुवारी २०२४ या ४५ दिवसांच्या कालावधीमध्ये शाळा, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर शाळांचे मूल्यांकन होवून प्रोत्साहन देण्यासाठी शाळांना भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत. यासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा पद्धतीने करण्यात आली आहे. अभियानात सहभागी शाळांना विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी ४० गुण अशाप्रकारे १०० गुणाद्वारे शाळांचे मूल्यांकन केले जाणार आहे. शाळांचे मूल्यांकन प्राथमिक स्तर, तालुका स्तर, जिल्हा, विभाग व राज्य अशा प्रकारे केले जाणार आहे. प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन समिती केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी निश्चित करुन देतील त्या केंद्रातील शाळांचे मूल्यांकन करेल. गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावरील मूल्यांकन समिती मूल्यांकनाचे काम करेल. केंद्र स्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुका स्तरावरील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांची निवड करण्यात येईल. जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या प्रथम क्रमाकांच्या शाळांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांची निवड करेल. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाच्या शाळेची निवड विभागासाठी आणि प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळेची निवड राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी होणार आहे.

तालुकास्तरीय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे. रू. ३.०० लक्ष, रू. २,०० लक्ष, व रू. १.०० लक्ष अशाप्रकारे पारितोषिके देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस रू. ११.०० लक्ष, रू. ५.०० लक्ष, व रू. ३.०० लक्ष अशाप्रकारे पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर विभाग पातळीवरील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुज्ञेय पारितोषिक रक्कम अनुक्रमे रू. २१.०० लक्ष, रू. ११.०० लक्ष, व रू. ७.०० लक्ष, राज्य पातळीवर निवड होणाऱ्या शाळेस पहिल्या क्रमांकास रू.५१.०० लक्ष, दुसऱ्या क्रमांकास रू. २१.०० लक्ष तर तिसऱ्या क्रमांकास रू.११.०० लक्ष अशाप्रकारे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

जिल्ह्याला राज्यात गुणवत्ता व स्वच्छते मध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी व शासनाची भरघोस बक्षिसे मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियायानात सहभागी होवून आपल्या शाळेला मूल्यांकनामध्ये अधिकाधिक गुण प्राप्त होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा