You are currently viewing आजगावात मुलांना आकाश निरीक्षणाचा विलक्षण अनुभव

आजगावात मुलांना आकाश निरीक्षणाचा विलक्षण अनुभव

साहित्यिक विनय सौदागर यांचे लाभले मार्गदर्शन

 

आजगाव (विनय सौदागर):

बाबांची जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर (३०/८/२३ ते ३०/८/२४) विविध कार्यक्रमांनी कै.वामन नारायण सौदागर यांची जन्मशताब्दी साजरी केली जात असून दिनांक ३०/१२/२३ (१/१/२४) रोजी पाचवा कार्यक्रम पार पडला. पाचव्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना अनोखा असा अनुभव देण्याच्या दृष्टीने आकाश निरीक्षण हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. आकाश निरीक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून विनय सौदागर यांनी काम केले.

मुलांना ग्रह नक्षत्रांची ओळख व्हावी हा उद्देश नजरेसमोर ठेवत प्रथमच आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु, शुक्र,मंगळ हे ग्रह; व्याध, अगस्ती ,धृव हे तारे; शर्मिष्ठा, सप्तर्षी हे तारकासमूह, अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृग ही नक्षत्रे आदींची मुलांना ओळख करून देण्यात आली. त्यामुळे मुले आता दुर्बिणीविना ग्रह नक्षत्रे ओळखू शकतील. पू. गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या मुलांना निमंत्रित करण्यात आले होते. एकूण २३ मुलांचा सदर उपक्रमात सहभाग होता (११मुली व १२ मुलगे). एकूण दोन तास विनय सौदागर यांनी मुलांना अतुलनीय असे मार्गदर्शन केले. प्रथम वर्गात मूळ विषय समजावून सांगितला. नंतर आजगाव हायस्कूलच्या पटांगणावर प्रत्यक्ष आकाश निरीक्षण केले. मुले सदर कार्यक्रमासाठी रात्रीच्या वेळेत उपस्थित होती. यासाठी पालकांचे देखील उत्तम सहकार्य लाभले.

उपक्रमात सहभागी सर्व मुलांना सौदागर कुटुंबियांकडून नववर्षासाठी दैनंदिनी (डायरी) भेट देत अलीकडेच वाचन, लेखन कला लोप पावत असताना पुन्हा मुलांनी लेखन, वाचनाकडे आकर्षित व्हावे यादृष्टीने लिहिण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा