You are currently viewing श्री गणेश मंदिर, गिर्ये-बांदेगांवचा ४५ वा वर्धापनदिन व डॉ. अंकुश सारंग गौरव सोहळा उत्साहात संपन्न

श्री गणेश मंदिर, गिर्ये-बांदेगांवचा ४५ वा वर्धापनदिन व डॉ. अंकुश सारंग गौरव सोहळा उत्साहात संपन्न

देवगड :

 

गिर्ये-बांदेवाडी – आदर्श सेवा संघ, बांदे (रजि.) संचालित श्री गणेश मंदिर, बांदेगांवचा ४५ वा वर्धापन दिन मंगळवार दिनांक २६।१२।२०२३ ते शनिवार दिनांक ३०।१२।२०२३ या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून याच गांवचे सुपुत्र व प्रसिद्ध लेखक, कवी डॉ. अंकुश तुकाराम सारंग यांचा गौरवही मोठ्या थाटात संपन्न झाला.

डॉ. अंकुश सारंग यांनी आपली अनेक कथा व कवितांची तसेच संशोधनात्मक पुस्तके प्रकाशित झाली असून नुकतेच मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या त्यांच्या ’गाबित समाज आणि फाग गीते’ या ग्रंथाला निवड मुंबई विद्यापीठाने एम. ए. पार्ट-२ अभ्यासक्रमासाठीर केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेले ’गाबित समाजाच्या शिमगोत्सवात गायले जाणारे फाग’ रुईया कॉलेज, मुंबई, पुणे विद्यापीठ, कोल्हापूर, कर्नाटक विद्यापीठ यांनी विविध अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेतले आहेत. त्यामुळे कोकणातील गाबित समाजाचे नांव जगाच्या क्षितीजावर नेण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. सारंग यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांच्या गौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रमोद कांदळगांवकर यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बिपीन जोशी, साप्ताहिक देवदुर्गचे संपादक आनंद लोके, डॉ. आर. एम. पोकळे, डॉ. अंकुश सारंग, ज्येष्ठ शिक्षिका व लेखिका सौ. संजीवनी फडके, विजयदुर्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बिर्जे, गिर्ये गांवच्या उपसरपंच सौ. मनस्वी गांवकर, मंडळाचे अध्यक्ष प्रेमनाथ माळगांवकर, कार्याध्यक्ष नंदकिशोर जाधव, सचिव सेवानंद पोसे, लेखक / कवी उदय माळगांवकर, श्रींचे पुजारी व पाटील उमाजी माळगांवकर तसेच मंडळाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. बिपीन जोशी म्हणाले की, आदर्श सेवा संघ गेली ४५ वर्षे सातत्याने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करीत असून या कार्यक्रमाला आपणास उपस्थित रहावयास मिळाले हे आपले भाग्य समजतो. डॉ. सारंग यांनी सत्काराला उत्तर देताना आदर्श सेवा संघ, बांदे या संघाच्या सर्व पदाधिकारी व गावातील सर्व समाज बांधवांचे ऋण व्यक्त केले व आपल्या कार्याची व्याप्ती त्यासाठी कोणी कोणी कशी मदत केली, हे पुस्तक प्रकाशित करुन ते विद्यापीठात अभ्यासक्रमात लागेपर्यंतचा सर्व खडतर प्रवास विषद केला.

प्रमुख पाहुणे संपादक श्री. आनंद लोके यांनी बोलताना आदर्श सेवा संघाच्या या सातत्याने करत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करुन येणारा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात साजरा करुन आम्हाला या कार्यक्रमास येण्याची संधी प्राप्त करुन द्यावी, अशी आशा व्यक्त केली.

डॉ. अंकुश सारंग यांचे कार्य अतुलनीय असून त्यांनी गाबित समाजाचे नांव या निमित्ताने जगाच्या नकाशावर झळकाविले असून समाजातील होतकरु विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या या पुस्तकावर पीएच. डी. करुन त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करावे, असेही आवाहन श्री. आनंद लोके यांनी केले.

डॉ. आर. एम. पोकळे म्हणाले की, आपण या मंदिराच्या पहिल्या कार्यक्रमाचे साक्षीदार असून गेली ४५ वर्षे या कार्यक्रमासाठी सातत्याने येत आहे.

अध्यक्ष स्थानावरुन बोलताना प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रमोद कांदळगांवकर म्हणाले की, आदर्श सेवा संघाच्या सर्व कार्यक्रमांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम करीत असतात. फक्त धार्मिक विधीला महत्त्व न देता या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सामाजिक कार्यक्रम उदा. स्वच्छता मोहिम, दत्त जयंती उत्सव, भव्य दिव्य पालखी मिरवणूक, महिलांसाठी रासगरबा, भजने, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामने, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा, महिलांसाठी संगीत खुर्ची, हळदीकुंकू समारंभ, मान्यवर कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आदी उपक्रम राबवितात, याचे फार मोठे कौतुक वाटते. डॉ. सारंग यांनी ग्रंथरुपाने केलेले कार्य समाजासाठी अतिशय प्रेरणादायी असून समाजाचे नांव पार जागतिक पातळीवर नेले असल्याचे नमूद करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामन्यात विजेत्या ठरलेल्या पहिल्या तीन संघांचे रोख बक्षिस व चषक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. संतोष माळगांवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंडळाचे अध्यक्ष प्रेमनाथ माळगांवकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 6 =