You are currently viewing झालं गेलं विसरुन जा..

झालं गेलं विसरुन जा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*झालं गेलं विसरुन जा*.

 

 

एखादे वेळेस काय होतं, एखादी व्यक्ती बोलताना काहीतरी बोलून जाते आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्या व्यक्तीच्या बोलण्याचा निराळाच अर्थ उमटतो. जो चांगला नसतो, नकारात्मक असतो, दुखावणारा असतो. नात्यांमध्ये अंतर निर्माण करणारा असतो.

वास्तविक बोलणारी व्यक्ती सहज बोलून जाते. कदाचित तिच्या मनात कुणाला दुखवावं असा हेतूही नसतो किंवा यातून असा काही अर्थ निघेल याचे भान तिला नसते. पण तरीही तडा जातो, जोडलेलं तुटतं, जखम वाहत राहते, केवळ गैर समजामुळे. असा गैरसमज मनात राहिला तर त्याचे स्वरूप वाढत राहते, प्रबळ होते आणि ते नातेसंबंधात अतिशय घातक ठरते.

 

एक साधा प्रसंग.

दारावर बेल वाजली. वास्तविक मी सकाळच्या कामांच्या घाईत आणि पळत्या घड्याळाबरोबर कामावरून ऑफिसात वेळेवर पोहोचण्याच्या चिंतेत असतानाच कोणीतरी आलं होतं

. दार उघडले.

दारात शेजारचे आप्पा मुळगुंद होते. मी पटकन त्यांना विचारले,” काय काम आहे आता तुमचे आप्पा? मी जरा घाईत आहे.”

आप्पांचा चेहरा कसनुसा झाला आणि ते आल्या पावली परत गेले.

त्यानंतरचा माझा सर्व दिवस व्यस्त गेला. आप्पांचे येणे मी विसरूनही गेले. मी काहीतरी गैर बोलले, गैर वागले हे मला तेव्हां कळले जेव्हां रात्री आप्पांच्या सुनेचा मला फोन आला.

“ काकू !तुम्ही आप्पांना असं काय बोललात? त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा? ते फक्त चावी द्यायला आले होते तुमच्याकडे. पण तुमच्या फटकन् विचारलेल्या प्रश्नामुळे ते खूप दुखावले आहेत. ठीक आहे मी त्यांना समजावले आहे. पण इथून पुढे तुम्हाला त्रास होईल असे सहकार्य तुमच्याकडून आम्ही घेणार नाही.”

तिने फोन ठेवला आणि मी डोक्यावरच हात मारला.

किती साधी गोष्ट इतकी भरकटली? आप्पा अनेक वेळा माझ्याकडे त्यांच्या घराची चावी द्यायचे मग आजच इतका पराचा कावळा त्याने का करावा? परिणामी मलाही खूप राग आला. “नाही तर नाही” अशा मोडमध्ये मीही गेले. पुन्हा आप्पा कधीही आले नाही आणि मी त्यांना “का आला नाहीत?” म्हणून विचारलेही नाही.

“शेजारी” हे नातं मात्र तुटलं.

कोण बरोबर,कोण चुक हा प्रश्नच नव्हता. होता तो फक्त गैरसमज.

तसे या गैरसमजाचे तोटे आयुष्यात अनेकदा अनुभवले. काही गैरसमज काळाच्या ओघात वाहून गेले. तुटलेले पुन्हा जुळले. काही मात्र मनात अढी करून कायमचे वास्तव्यात राहिले.

बहिणीकडे नवरात्रीतले अष्टमीचे सवाष्णी पूजन होते. मीही गेले होते. दहा माहेरवाशींणी सवाष्णींची यादी आधीच झालेली होती. बहिणीने मला त्या सवाष्णं पूजनात समाविष्ट केलेच नाही. तशी मी काही संकेतांना मानणारी नाही. पण कधी कधी मन मऊ होतंच की!शिवाय विवाहानंतर आची जात, कुटुंब बदलले. बहिण उच्च जातीतली. बहिणीच्या या मला डावलण्याच्या कृतीमुळे माझ्या सौभाग्याचा, सवाष्णीपणाचा अपमान तर झालाच शिवाय एका जातीभेदाचं भूतही डोक्यात शिरलं.तिच्या स्टेटस मधले आपण नसू असेच मला त्यावेळी वाटले. आणि तिने असे का करावे याचा मला आजही प्रश्न आहे. मी तिला याविषयी कधीच बोलले नाही. तिनेही कधी विचारले नाही कारण मुळातच तिला कल्पनाच आली नाही की एका लहानशा कृतीने तिने मला दुखावले. असो. शेवटी सारे गैरसमजच.

पण आता विचार करताना वाटतं गैरसमज एक अशी शक्तिशाली गोष्ट आहे जी जगाले सर्वात सुंदर नातं एका क्षणात मोडते. गैरसमज हे एक अत्यंत जहाल विष आहे. हे विष शंभर आनंदांच्या क्षणांना विसरायला लावते. व्यक्ती मधलं अंतर वाढवते. यासाठी एकच करावे मनातली अढी बोलून, चर्चेद्वारे दूर करावी. प्रश्न चर्चेने सुटू शकतो. झालं गेलं विसरून जा” म्हणून नात्यातला गोडवा टिकवावा. तारतम्याचा विचार करून,अहंकार सोडून, सह अनुभूतीने एकमेकांना समजून घेऊन, झालेले गैरसमज दूर करणे हेच योग्य आहे. कधी क्षमा मागावी कधी क्षमा मागण्यारांना क्षमा करावी आणि जीवनाच्या प्रवाहात आनंदाने उतरावे. सगळ्यांना सोबत घेऊन. अत्यंत समंजसपणे.

 

*राधिका भांडारकर पुणे*.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा