You are currently viewing गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार

गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार

*गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू होणार असून, या वेतन कराराला उशीर झाला आहे. मुंबईला १८ डिसेंबरला द्विपक्षीय वेतन समितीचे मिटिंग होणार असून, ही सेमी फायनल असणार आहे, असे स्पष्ट उदगार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणचे चेअरमन राजीव जलोटा यांनी काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने देव दिवाळी निमित्ताने “पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२३” चे प्रकाशन १३ डिसेंबर २०२३ रोजी बेलॉर्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे फिटनेस तळवलकर जीमचे मालक मधुकर तळवलकर आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.

याप्रसंगी राजीव जलोटा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कार्गो हँडलिंगमध्ये आपण उच्चांक गाठला आहे. पोर्टची परिस्थिती आता थोडीशी व्यवस्थित आहे. जेएनपीटीमध्ये दोन खाजगी टर्मिनल आली आहेत. त्यामुळे कार्गो मुंबई पोर्टकडे कसा येईल हे आपणास पाहावे लागेल. क्रूड ऑइल स्थिर आहे. क्रुझ व्यवसाय सुरू झाला आहे. एक महिन्यात स्टील भरपूर येणार आहे. मुंबईत जागतिक बंदर शिखर परिषद झाल्यापासून परदेशी बंदराचे अनेक प्रतिनिधी आपल्या पोर्टला भेटी देतात.

फिटनेस तळवलकर जिमचे मालक प्रमुख पाव्हणे मधुकर तळवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन झाले असून, पोर्ट ट्रस्ट कामगार अंक सुंदर झाला आहे. अनेक लेख वाचनीय आहेत. आपल्या शरीराची सेवा करा. प्रकृती उत्तम ठेवा. मानवाची सेवा करा. प्रत्येक माणूस सुंदर आहे, व्यायाम करून दीर्घायुषी व्हा, आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. दुसऱ्याची सेवा केली पाहिजे. शरीराची सेवा करा. आयुष्य पाहिजे असेल तर व्यसनापासून दूर राहा. चांगल्या सवयी लावा.

ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण करताना आरोग्याचा मंत्र दिला की, भूकेपेक्षा कमी खा. जास्त चाला. भूक नसेल तर खाऊ नका. दिलेले काम मनापासून करा. यामधून आनंद मिळेल. आम्हांला निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले म्हणून युनियनने १०३ वर्ष पूर्ण केली आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु पुरस्कारांपेक्षा कामगारांचे प्रेम महत्त्वाचे आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात ३५० ते ४०० दिवाळी अंक निघतात. परंतु कोणाचाही असा प्रकाशन सोहळा होत नाही. १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या वेतनकरारा बाबत काही मागण्या मान्य झाल्या असून, फिटमेंट, महागाई भत्ता, वार्षिक पगारवाढ या मागण्या मान्य झाल्या तर लवकरच वेतन करार होईल. युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांनी हृदयरोग, बीपी, डायबेटीज यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे शिवाजी सावंत, नुसीचे मकसूद खान, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, मराठा विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी किरण नलावडे, ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शीला भगत, योगिनी दुराफे, सतीश घाडी, जतिन कदम यांनी समूहगीत म्हंटले. प्रकाशन सोहळ्याला युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा