*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक, “भोवतालकार” साहित्यिक विनय सौदागर यांच्या “मायकू” मालवणी काव्यसंग्रहाचे डाॅ. सतीश पवार यांनी केलेलं रसग्रहण*
=======================
*मायकू*
*मालवणी हायकू*
कवी:- विनय सौदागर.
हायकू हा जपानी काव्यप्रकार प्रसिद्ध आहे. मालवणी मध्ये हा आधी कोणी वापरला असेल तर मला कल्पना नाही.
मायकू हे मालवणी हायकू विनय सौदागर यांनी गेल्या वर्षभरात लिहिले असून वर्षातील त्या त्या दिवसांचे प्रतिबिंब यात पडले आहे.
तीन ओळींचा हा काव्यप्रपंच असून त्याचा अर्थ सर्वांना कळावा म्हणून सोबत मराठीतील चार पाच वाक्ये सुद्धा आहेत.
कवी आपल्या आजूबाजूच्या मालवणी निसर्गाचे, झाडापेडांच, नदी व्हाळांचे, माणसांचे, जनावरांचे, भौतिक, सांस्कृतिक बदलांचे बारीक निरीक्षण करत असून थोडक्या शब्दात सत्य सांगायची हातोटी कवीला गवसली आहे.
**
गोठो शिवलो
घरात गळतला
गोरू निदतला
पावसात गळू नये यासाठी शेतकरी आपल्या घराच्या अगोदर गुरांचा गोठा दुरुस्त करतो कारण गुरांना गोठ्यात त्रास होऊ नये ही त्यांची भावना.
**
झाड सुकला
तरी पण फुलता
देव भुलता
उन्हाने जास्वनद पुरी सुकत चालली तरीही चारी अंगाने फुलते आहे. देव पण तिच्यावर भुलला असेल.
**
चेडवा गेली
आवस धुसपुसता
सून हसता
चेडु- मुलगी
**
जीव कष्टेलो
कामेऱ्यांचा सांगणा
पेज मागना
शेतात काम करणाऱ्या स्त्रियांचे हाल सांगणारे हळुवार शब्द
**
फुलांचे वांदे
वानदर लाय चुनो
देव्हारो सुनो
आता गावात माणसांपेक्षा माकडे जास्त आहेत. त्यांनी केलेल्या विध्वंसामुळे देवपूजेला फुले दुरापास्त झाली आहेत.
**
डोंगर खुस
मायनिंग पोटात
झालो सपाट
पोटात खनिज असल्याने डोंगर भुईसपाट होत आहेत.
इकास यम
डंपरान घुरता
गाव झुरता
डंपर यम गाव घेरायला लागले आहेत. विकास दारापर्यंत आला की झाडापेडानी बहरलेले गाव झुरून जाते, संपून जाते.
**
रान सोपला
बिबटो इलो लागी
कुत्र्याक मागी
आसपासची जंगले संपत जाताहेत आणि हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीजवळ येत आहेत.
**
मामाची साद
गाराफ म्होवारता
गरो धावता
मोसम बदलतो. आंबा फणस मोहरतो. ते खाण्यासाठी मामाचे काळीज भाचे मंडळींना शोधू लागते. या झाडापेडातून मामाच्या हाका ऐकू येतील.
**
जग धावता
मी पून धावतय
माती खातय
**
माडाचो नेम
गराज आवरता
टाकी चुडता
उन्हाळ्यात माड पाणी कमी झाल्याने आपल्या फांद्या फेकून देतो आणि आपली गरज कमी करतो. निसर्ग आपल्याला शिकवत असतो. आपलेच लक्ष नसते.
**
केळ तोडली
तरी उगवता
सत्य सांगता
केळीचे झाड तोडली तरी परत उगवते कारण मूळ जमिनीखाली असते. यातून काही अध्यात्मिक सत्य कवीला दिसू लागते.
**
आमची चुकी
पाणी गेला तळाक
नाय कळाक
माणसाच्या चुकीने पाण्याची पातळी खाली जात आहे पण त्यापासून आपण काहीच बोध घेत नाही.
**
फुलाचो शौक
वयत उभ्या केला
तरीय फुला
अनेक झाडांना बागेत स्थान नाही. त्यांना कुंपणात उभे केले जाते. तरी तेथे ती डौलाने फुलतात.
**
बापाचो जीव
जमिनी सामाळूया
घाम गाळूया
**
खो खो फुलांचो
पार्दिकाक इसार
चाफ्यार भार
निसर्गचक्र चालते त्याला कवी खो खो ची उपमा देतो. प्राजक्ताचा मोसम संपला की चाफ्याला जोर येतो.
हे 365 मायकु संपूर्ण वर्षाचे मालवणी जीवन डोळ्यासमोर आणतात.
खूप छान.
विनय सौदागर यांचे याआधी भोवताल आणि सभोवताल हे काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ सतीश सदाशिव पवार
कणकवली
10 डिसेंबर 2023.