You are currently viewing पुणे संकल्प सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले

पुणे संकल्प सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले

समुद्रात बुडालेल्या एकाचा अद्याप शोध सुरू, एकाला वाचविण्यात यश; चार विद्यार्थिनींचे मृतदेह सापडले

 

देवगड :

 

देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या सहलीमधील विद्याथ्र्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही.हे विद्यार्थी पाण्यात उतरून आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सहाही जण बुडाले.यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून एकजण बेपत्ता आहे तर चारजणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला त्यांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले.ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल शुक्रवारी मालवण येथे पर्यटनासाठी आली होती. शुक्रवारी मालवण पाहिल्यानंतर ही सहल शनिवारी सकाळी देवगडमध्ये दाखल झाली. प्रथम कुणकेश्वर येथे दर्शन घेवून दुपारी देवगडमध्ये जेवणानंतर पवनचक्की येथे गार्डनमध्ये गेले. यातील काही विद्यार्थी हे पवनचक्की येथून खाली देवगड बीच येथे उतरले‌. यावेळी त्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही, यामुळे ते पाण्यात उतरले. मात्र देवगड समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. बुडत असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक, जीवरक्षक यांनी धाव घेतली. त्यांना पाण्यात उतरून वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. यामध्ये आकाश सोमाजी तुपे ( वय २२ रा. रूपीनगर पुणे ) याला वाचविण्यात यश आले, तर प्रेरणा रमेश डोंगरे ( वय २१, रा. घरकुल चिखली पुणे ), अनिषा नितीन पवळ ( वय १९, रा. चिखली ताम्हाण वस्ती ), अंकिता राहूल गलाटे ( वय २१, कृष्णनगर चिखली ), पायल राजू बनसोडे ( वय २१, चिखली पुणे ) यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्यांना ग्रामीण रूग्णालयात तात्काळ नेल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्हीटकर यांनी चारही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर यातील त्यांना वाचविण्यासाठी गेलेला विद्यार्थी रामचंद्र घनश्याम डिचोलकर ( वय २२, कणकवली सिंधुदुर्ग ) हा बेपत्ता असून त्याचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. यातील एका विद्यार्थीनीला पोलिसांच्या गस्ती नौकेने पाण्यातून नौकेत घेतले व देवगड बंदरावर आणण्यात आले. तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान या घटनेची माहिती सैनिक अकॅडमीच्या शिक्षकांनी देवगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, अ‍ेएस्आय ए.जे.आगा, विशाल वैजल, आचरेकर तसेच तहसिलदार आर. जे. पवार, नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी घटनास्थळी दाखल झाल्या.

तहसिलदार श्री. पवार यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेची माहिती घेतली. दरम्यान देवगड येथील विष्णू धुरत, मंदार धुरत, जितेश मोहिते, अवि खडपकर आदी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून बुडत असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. सहाजणांपैकी बेपत्ता असलेल्या डिचोलकर यांचे नातेवाईक कुणकेश्वर येथे असल्याचे समजते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा