You are currently viewing नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखे

नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखे

नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखे

काठमांडू येथे १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजन

पिंपरी

तिसरे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन दिनांक १२ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत नेपाळची राजधानी काठमांडू येथे संपन्न होणार आहे. उदघाटन, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, मुलाखत, परिसंवाद, गझल, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात संपन्न होणार असून ‘बकुळगंधकार’ व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष कवी राजन लाखे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक व प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद गोंधळी हे असणार आहेत. इंडोनेशिया आणि दुबई येथील यशस्वी आयोजनानंतर हे तिसरे अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलन नेपाळ येथे संपन्न होणार आहे, असे संमेलनाच्या आयोजिका कल्पना गवरे (UK) स्नेहल आर्टस् अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष यांनी सांगितले.

सदर संमेलनास अमेरिकेहून साहित्यिक डॉ. कलिंद बक्षी सोबत किन्नरी बक्षी, पुणे येथून माजी साहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अनिल गुंजाळ, गझलकार मीना शिंदे, बबन धुमाळ, कवी संजय जगताप तसेच पनवेल येथून रवींद्र सोनवणे, वैज्ञानिक सुधाकर अमृतकर, ठाणे येथून साहित्यिक विवेकानंद मराठे, गोवा येथून नृत्यांगना शोभा धामसकर तसेच विविध मान्यवर, साहित्यिक, रसिक सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या प्रथम सत्रात दीप प्रज्वलन, ईशस्तवन उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, अतिथी सन्मान, अतिथी मनोगत, मकरंद गोंधळी यांचे व्याख्यान, राजन लाखे यांचे अध्यक्षीय मनोगत असा कार्यक्रम असणार आहे.
द्वितीय सत्रात ‘मराठी साहित्यावर होणारा सोशल मीडियाचा परिणाम’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अनिल गुंजाळ परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. परिसंवादात प्रमोद मकासिरे, विवेकानंद मराठे, रवींद्र सोनवणे, डॉ. संजय जगताप, नंदकुमार पवार आणि गंगाधर रासगे सहभागी होणार आहेत.
स्नेहभोहजनानंतरच्या तिसऱ्या सत्रात ”बकुळगंध फुलताना’ या विषयावर बकुळगंध पुस्तकाचा प्रवास राजन लाखे त्यावरील भाष्यातून उलगडणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची गीते सादर होणार आहेत.
चौथ्या सत्रात काव्य आणि गझलकट्टाचे आयोजन करण्यात आले असून पाचव्या सत्रात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सदर साहित्य संमेलनाबरोबरच काठमांडू, पोखरा, पशुपतीनाथ मंदिर आणि नेपाळमधील प्रेक्षणीय स्थळे यांच्या पर्यटनाचा आनंदही सर्व साहित्यिक आणि रसिक यांना घेता येणार आहे, असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा