*भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले प्रशासनाचे आभार*
ओरोस :
संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा भारतीय नौदल दिनाचा कार्यक्रम दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे यशस्वीपणे संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण यांच्या दमदार नेतृत्वाला तेवढीच समर्थ साथ या जिल्ह्यातील जनता आणि त्यासोबत जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वांच्या दृष्टीने हा घरचा कार्यक्रम होता आणि त्या भावनेनेच प्रशासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावत आमच्या भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेनेही रात्रंदिवस मेहनत घेतली.
सन्माननीय नारायणराव राणे साहेबांचे मार्गदर्शन आणि निलेशजी राणे यांनी पालकमंत्री साहेबांच्या खांद्याला खांदा लावून केलेलं नियोजनाचे काम, आमदार नितेश राणे, राजन तेली यांचे सर्वतोपरी सहकार्य या सर्वाचा परिपाक म्हणजे या कार्यक्रमाचे यश होय.आज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे यां सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत आभार व्यक्त केले.
राजकोट किल्ल्याचे स्वरूप केवळ ७२ दिवसात बदलून तिथे उभारल्या जाणाऱ्या छत्रपतींच्या भव्यदिव्य पुतळ्याला साजेसा किल्ला उभा करण्याचे आव्हान बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम खात्याने यशस्वी करून शासकीय कामकाजाचा नवा आदर्श निर्माण केला. पोलीसांनी एकूणच व्यवस्था नियोजन डोळ्यात तेल घालून सांभाळले. इथली पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य विभाग, बांधकाम खाते,विद्युत विभाग,नगरपालिका आणि एकूणच प्रशासन यंत्रणा या सगळ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची सर्वोच्च प्रचिती दिली. हे एका अर्थाने नियोजन पर्वाचे शिवधनुष्य होते, पण ज्या पद्धतीने पूर्ण ताकद लावत आपल्या शासकीय यंत्रणेने ते उचलले त्याचे कौतुक खुल्या दिलाने करायला आम्हाला आनंद होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा, एसटी व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा या सर्वांचे यासाठी आम्ही अभिनंदन करत आहोत. सर्वानीच हा कार्यक्रम यशस्वी केला, जनतेने आपले योगदान दिले, ज्यातून पूर्ण देशात आपल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे असे कौतुक करत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.