*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*मोबाईल गेम्स*
मी अगदी आत्ताच माझ्या हातातील फोन खाली ठेवला आणि हा लेख लिहावयास बसले. इतका वेळ फोन घेऊन काय करत होते मी? व्हाट्सअप पाहत असेन असेच वाटले असेल ना तुम्हाला? छे हो!मुळीच नाही. मी चक्क फोनवर पत्त्यांचे गेम्स खेळत होते. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? पत्ते खेळायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडते की! सुट्टीच्या दिवशी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत अथवा बाहेरगावी फिरायला गेलो असताना जेवणे झाली की आम्ही सगळेजण पत्ते खेळत बसायचो. झब्बू हा तरआमचा अतिशय आवडीचा पत्यातला डाव!
आता वैज्ञानिक क्रांतीच्या या काळात परिस्थिती बदलली. रिकाम्या फावल्या वेळात घरातली सर्व मंडळी एकत्र बसलेली जरी दिसली
तरी प्रत्येक जण आपापल्या फोनवर व्यस्त असतो. कोणी फेसबुक, कोणी इंस्टाग्राम, कोणी व्हाट्सअप तर कोणी ऑनलाईन गेम्स!
अनेकविध गेम्स यावर उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त हव्या असलेल्या गेमची ॲप फोनवर, आय पॅड वर, टॅब वर, अथवा तुमच्या लॅपटॉप वर
डाऊनलोड करायची आणि खेळत खेळत स्वतःचा जीव रमवायचा.
आता हे असे खेळणे योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हं! जोपर्यंत या खेळाचा जुगार होत नाही, तोपर्यंत खेळायला काहीच हरकत नाही असे मला वाटते.
माझ्या ओळखीत अशा कितीतरी स्त्रिया आहेत की दुपारी एके ठिकाणी जमून पैसे लावून रमी खेळतात. एखादी जिंकत गेली की तिची हाव वाढत जाते आणि ती अजून अजून पैसे लावते, इतके की शेवटी तिची पर्स रिकामी होते.
यालाच म्हणतात जुगार मग तो ऑफलाईन असला काय किंवा ऑनलाईन असला काय? तो वाईटच. ते एक प्रकारचे व्यसनच आहे.
आता फोनवर जाहिराती देऊन तुम्ही अमुक एक रक्कम लावून खेळा म्हणजे तुम्हाला इतके इतके पैसे मिळतील, तुम्ही मालामाल व्हाल असे आमिष दाखवतात, ते सर्वतोपरी चुकीचे आहे. जाहिरातदारांचा तो धंदा आहे, पैसे कमावण्याचे साधन आहे.आपण खेळणार्यांनी आपली सदसद्विविवेकबुद्धी जागृत
ठेवावयास हवी. काही वेळापुरते मनोरंजन, तणावयुक्त जीवनातून थोडा काळ मुक्ती याच दृष्टीने ऑनलाइन खेळ खेळण्यास माझा मुळीच विरोध नाही.
खरंतर मी स्वतः बरेच खेळ खेळत बसते आणि माझे असे ठाम मत आहे की जेष्ठ नागरिकांनी तर हे खेळ जरूर खेळावेत.
अलीकडे बऱ्याच जणांना अलझायमर होतो असे आपण ऐकतो. सेवानिवृत्तीनंतर खूपच रिकामपण आले तर मेंदूला गंज चढणारच नाही का? ज्येष्ठांना देण्यासाठी मुलाबाळांकडे हल्ली वेळही नसतो. अशा परिस्थितीत स्क्रॅबल, वर्ड फ्यूड किंवा डेली वर्डल, क्रॉसवर्ड अशा प्रकारचे खेळ खेळले तर मेंदूला चालनाच मिळते, विचारशक्ती वाढते, वेळही चांगला जातो. लेखन वाचन तर आहेच परंतु
अशा खेळांनीही विरंगुळा मिळतो. आपण रोजच्या वर्तमानपत्रातील शब्दकोडे, सुडोकू नाही का खेळत?
जस जसे वय वाढत जाते तस तशा आपल्या हालचाली मंदावतात. मी तर पिरॅमिड,
फ्री सेल, सॉलिटेअर हे पत्त्याचे ऑनलाइन खेळ
माझ्या हाताची बोटे भरभर चालावीत याचसाठी खेळत असते. आपण जितके जलद खेळू, तितके अधिक पॉईंट्स मिळतात. त्यामुळे सतत वेगाने खेळले पाहिजे ही जाणीव राहते आणि आपल्यातील चपळता टिकवण्याचा आपण सतत प्रयत्न करतो.
इतके मात्र नक्की की कोणत्याही गोष्टीचा
अतिरेक नसावा. फोन धरल्याने हाताला कळा लागेपर्यंत कोणीही खेळत बसू नये.
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन
०१/११/२०२३