You are currently viewing सारुनी पदर धुक्याचा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सारुनी पदर धुक्याचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*

*सारुनी पदर धुक्याचा*

धुक्याची लपेटुनी चादर
शांत पहुडली आहे पहाट….
सोन किरणे लेवुनी रवि
येण्याची सृष्टी पाहते वाट…

पहाटेची गार हवा…अंग गारठून टाकणारी गुलाबी गुलाबी थंडी…ओठांची थरथर.. श्वासांच्या हाती हात देत मुखातून बाहेर पडणारी उष्ण हवा अन् थंडीच्या मिलनातून हवेत सैर करणाऱ्या वाफा…अंगावर गारठ्याने उभा राहणारा काटा…हातांना हातांनी गोंजारल्यावर नकळत पळून जायचा थोडं उबदार वाटायचं. रात्रभर झाडांच्या पान-फुलांना न्हाऊ घालून पहाटे पहाटे टप टप टपकणारे दवबिंदू अंगावर सांडताच शहारून येणारं अंग…गवताच्या पात्यांवर दवबिंदूची शाळा भरावी..तसे गवताच्या पातींवर दवबिंदू साठलेले होते…धुक्याने न्हालेल्या पाती चंदेरी वस्त्र नेसून स्वर्गलोकीच्या अप्सरेवानी दिसत होत्या… अन् पातीच्या शेंड्यावरून एक एक दवबिंदू धरणीच्या कुशीत विसवण्यासाठी झेपावत होता… धरित्रिने त्यास मायेने आपल्या कुशीत घ्यावा…जसा आईने मुलाला कुशीत घेऊन वरून पदर ओढून घ्यावा अगदी तसाच दवबिंदू कुशीत विरतो अन् धरणी माता मायेचा पदर ओढून घेते..दवबिंदूची धरतीकडे असणारी ती ओढ विलक्षणच…!
निशेच्या अधीन जाऊन झाडांवर विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांना जाग येताच होणारा किलबिलाट, आपापसातील कुजबुज मन सुखावते… ती दूर उडून पिल्लांसाठी अन्न शोधून आणण्यासाठीची लगबग… घरट्या भोवती पिंगा घालत जणू आपल्या पिल्लांना आश्र्वासित करणं “मी इथेच आहे….” मनाला भावते… माळरानाच्या विस्तीर्ण सड्यांवर पसरलेल्या रान फुलांवर मायेची फुंकर घालत विहार करणारे शुभ्र धवल कोवळे धुके मन मोहून टाकते… पवनाचे आगमन होताच फुला पानांना गोंजारत धुके दूर दूर उडत जाते.. हिरवे गार गालिचे दवांकुरांनी न्हाऊन गेलेले पाहताना ते दृश्य अवर्णनीय भासते… जणू स्वर्गलोकीच असल्याचा भास होतो…!

हिरवे हिरवे गार गालिचे
सुवर्णकिरणे सरसर येती
शुभ्र धवल पदर धुक्याचे
अलगद जाती स्पर्शून धरती
रात्रभर निशेच्या कुशीत पहुडलेली सृष्टी रविराजाच्या आगमनाची वाट पाहत असते… सुवर्ण किरणे अंगोपांगी लेवुनी येणाऱ्या भास्कराच्या स्वागतास नटून सजून सज्ज असते…पहाटेची कोंबड्याची बांग होते…न्हाणीघरात विस्तव चुलीत सारला जातो…विस्तवाच्या उष्ण स्पर्शाने अंगात ऊब येते… सुवासिनींचा शेणसडा होताच दारावर चुण्याच्या ठिपक्यांची रेखीव रांगोळी सजते…तुळशी वृंदावनी कलशातून जलाभिषेक होतो…सुवासिक अगरबत्तीचा धूर धुक्यात मिसळतो… धरतीवर चांदणे पसरावे तसा प्राजक्ताच्या चांदण फुलांचा सडा अंगणी सांडतो…मधुमालती नम्रपणे लाल, गुलाबी, केशरी फुलांची ओंजळ भरून ओतत राहते…त्या मंदधुंद सुगंधाने अवघी धरा सुगंधित होते…लाल भडक जास्वंद फुलांच्या पुंकेसरांना छेडणारा छोटासा तेजपुंज लाल सुर्यपक्षी हळुवारपणे प्रेयसीचे चुंबन घ्यावे तसा नाजूक चोचीने फुलांचा रस प्राशन करतो…एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडताना हवेत स्थिरावताच त्याच्या पंखांची होणारी फडफड दृष्ट लागण्या एवढी विलोभनीय…सुंदर दिसते…सृष्टीवर पांघरलेली धुक्याची शाल पहाटेच्या हवेच्या तालावर कधी गडद तर कधी फिकट होत राहते…तळ्याच्या पाण्यावर वाफांचे तरंग उठतात…जणू पाणी आतल्या आत उकळून तप्त होतं…!
पश्चिमेला दूरवर चंद्रमा उषेचा निरोप घेण्यासाठी एकटाच तिष्ठत उभा असतो…रात्रभर चांदव्यासोबत नभांगणी जागर केलेल्या तारका हळूहळू लुप्त होऊ लागतात…जणू एक नवे पर्व सुरू होताना…जुन्याचा विसर पडावा तशी सृष्टी नवी वस्त्रे परिधान करते…अंधाराची…काळोखाची भयाण काळी वस्त्रे त्यागून नव्या दिवसाची शुभ्र धवल सोनेरी किनार अन् गुलाबी छटा असलेली साडी परिधान करून रविराजाच्या स्वागतास सज्ज होते…धुक्याची चादर बाजूला सारून प्राचीला कुरवाळत लाल केशरी भास्कर झाडा वेलींच्या आडून सृष्टीला चोरून पाहत हळूहळू नभांगणाकडे वर वर सरकतो…तो विशाल तेजोगोल वर चढताना सोनसळी किरणांची लयलूट होते…धुक्याची धवल चादर हळूच सोनसळी किरणांशी मैत्री करते…शुभ्र धवल धुक्याच्या पदराला दूर सारत कवडशातून घरात प्रवेश करणारी सोनकिरणे विलोभनीय दिसतात…तो सुवर्णक्षण अन् मंदिरातील घंटेचा मंजुळ नाद, टाळांची किणकिण, भुपाळींचे कर्णमधुर स्वर काना-कानात रुंजी घालू लागतात…आयुष्यात पुण्य कमविणे म्हणजे पहाटे पहाटे असे सोनेरी क्षण वाट्यास येणे असंच काहीसं वाटून जाते…
आकाशस्थ ज्योतिपैकी एक…आदित्यच्या उदयास्ताने दिवस – रात्र होतात तो दिनकर…भानू…भास्कर केशर लेवुनी नभांगणी अवतरतो…निशा आपले गाठोडे बांधून कधीच दूर निघून गेलेली असते पुन्हा एक धुंद सांज घेऊन येण्याच्या तयारीसाठीच…! एव्हाना पश्चिमेचा चांदोबा देखील डोंगराच्या आडोश्याला दिसेनासा झालेला होता… रविच्या उष्ण किरणांनी पहाटेपासून नदी, तलाव, झाडेवेली…साऱ्या सृष्टीवर मायेची, प्रेमाची घातलेली शुभ्र धवल धुक्याची चादर दूर सारली होती…अंगात सूर्याच्या उबदार प्रेमाची, मायेची साठवण होऊ लागली…शाळेतून बाहेर पडून कुमारिकेने महाविद्यालयात प्रवेश घेताच तिच्या वागण्या, चालण्या, बोलण्यात, पेहरावात जसा फरक होतो तसाच सृष्टीत बदल होत गेला…अन् धुक्याची चादर दूर सारुनी सृष्टी यौवनात आली…नितांत सुंदर दिसू लागली…!

*[दीपी]*
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४१९६

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 8 =