सावंतवाडी :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांचा वाढदिवस १ डिसेंबर ते १२ डिसेंबर यादरम्यान साजरा केला जाणार आहे. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अर्चना फाउंडेशन आणि अर्चना घारे परब मित्र मंडळाच्यावतीने विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली.
सौ अर्चना घारे परब संपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सौ.अर्चना घारे परब, सावंतवाडी महिला शहराध्यक्षा ॲड. सायली दुभाषी, विवेक गवस, नईद मेमन, मनोज वाघमारे, संदीप परब, वैभव परब आदी उपस्थित होते.
सौ. अर्चना घारे परब यांचा वाढदिवस १ डिसेंबरला सावंतवाडी येथील श्री देव नारायण मंदिरामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते तर प्रमुख साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे प्रवीण भोसले यांनी सांगितले.
तर १ डिसेंबरला सातार्डा साटेली येथील माऊली मंदिरात जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. ५ डिसेंबरला वेंगुर्ले हायस्कूल येथे ‘करियर गायडन्स’ चे आयोजन करण्यात आले आहे. मुलांना यावेळी डॉ. अजय दरेकर व दिनेश जाधव यांचे मार्गदर्शन होणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे श्रीरामवाडी श्रीराम विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. ६ डिसेंबरला दोडामार्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर सायंकाळी दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ डिसेंबरला कोनाळ कट्टा हायस्कूल येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ८ डिसेंबरला वेंगुले तालुक्यातील पाल अणसूर येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ डिसेंबरला विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कीट वाटपाचा कार्यक्रम दोडामार्ग आणि वेंगुर्ले येथे होणार आहे. १० डिसेंबरला वेतुरे वेंगुर्ले तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्याचे व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ डिसेंबरला आंबोली येथे हायस्कूलच्या मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२ डिसेंबर हा ना. शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही माजी राज्यमंत्री भोसले यांनी सांगितले.
पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या मालवण दौऱ्याने कोकणाला झुकते माप मिळेल. ४ डिसेंबरला नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाने कोकणाला भरभरून मिळेल, अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
देशाच्या नौसेनेचे कार्य मोठे आहे या राष्ट्रीय कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हा ‘नेव्ही डे’ म्हणजे कोकण वासीयांसाठी मोठा सोहळा असून हा तरुणांना प्रोत्साहन देणारा सोहळा आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांच्या येण्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून भरभरून मदत मिळेल व कोकणाला झुकते माप मिळेल आणि कोकणाचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षाही प्रवीण भाई भोसले यांनी व्यक्त केली.