You are currently viewing गझल मंथनचे पहिले अखिल भारतीय महिला गझल संमेलन रविवारी, १९ नोव्हेंबर, २०२३ ला पुणे येथे संपन्न

गझल मंथनचे पहिले अखिल भारतीय महिला गझल संमेलन रविवारी, १९ नोव्हेंबर, २०२३ ला पुणे येथे संपन्न

प्रतिनिधी (शोभा वागळे):

गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना, जि. चंद्रपूर द्वारा आयोजित केलेले, ऐतिहासिक, सुर्वण अक्षरात नोंद व्हावी असे व ‘गझल सम्राट’ आदरणीय भट साहेबांना स्वर्गातही धन्यता वाटावी असे अनोखे अजब पहिले अखिल भारतीय महिला गझल संमेलन रविवारी, १९ नोव्हेंबर २०२३ ला पुणे इथे संपन्न झाले.

खरं तर १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन होता व भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होता. तरी सुध्दा एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असे म्हणतो त्याप्रमाणे कार्यक्रमाला स्त्रियांमागे पुरुष उभे राहून अतिशय सुरेख आणि अविस्मरणीय असे संमेलन ‘वीर सावरकर अध्यायन क्रेंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रोड,पुणे येथे पार पडले व त्याचा एक वेगळाच आनंद लाभला.

ह्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गझल क्षेत्रातल्या महान गझलकारांना आमंत्रित केले होते. त्या महान गझलकारा म्हणजे इंदोरच्या मा. शोभा तेलंग, संमेलनाध्यक्षा, उद्घाटिका मा. संगीता ताई जोशी, गझलक्रांती पुरस्कार सत्कारमूर्ती मा. देवकामाई देशमुख, प्रमुख अथिती आ. उर्मिलामाई बांदिवडेकर(गझल गुरूवर्या), आणि स्वागताध्यक्षा मा. डॉ.स्नेहलताई कुलकर्णी. तसेच विशेष उपस्थिती मा.डॉ संदीप गुप्ते मा. किरण क्रेंद्रे, मा. प्रमोद खराडे, मा. म. मा. चव्हाण सर होते. सुत्र संचालन मा. गझलकारा वैशाली माळी मॅडम ह्यांनी केले.

सकाळच्या सत्रात चहा आणि पोहे खाऊन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नंतर स्वागताध्यक्षा मा. गझलकारा डॉ. स्नेहलताईनी स्वागत करून सर्वांचा परिचय करून दिला. तदनंतर ‘गझल अमृत’ दिवाळी अंक २०२३ चा व ‘गझल यात्री- भाग तीन’ गझल संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गझल अमृत व गझल यात्री चे संपादक आ. जयवंत वानखडे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संमेलनाच्या सत्कारमूर्ती, गझलकारा देवकामाई देशमुख मॅडमना “गझल- क्रांती” या सन्मानाने पुरुस्कुत करण्यात आले व त्यानंतर सगळ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

मान्यवरांच्या मनोगताने त्यांचे, आ. सुरेश भट सरांबद्दल त्यांंच्या पत्रव्यवहारातून गझलेचे शिक्षण त्यांनी कसे आत्मसात केले, त्यांच्या बरोबरच्या बैठकी व गझल प्रवासाबद्दल बरेच सांगितल्याने गझलेसाठी स्वतः कसे झोकून द्यावे ह्यांचे छान मार्गदर्शन मिळाले.

अखिल भारतीय महिला संमेलनाला एकूण सहा मुशायरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक मुशायरात मुशायरा अध्यक्षा व सुत्रसंचालिका होत्या. सुत्रसंचालन व सर्व गझलकारांचे सादरीकरण उत्तम झाले. आ. म. मा.चव्हाण सर प्रत्येक गझलकाराला प्रोत्साहित करत होते. त्यामुळे सर्वच गझलकारांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.

दोन मुशायरा नंतर जेवण होते. अतिशय चविष्ट आणि झक्कास. गुलाब जांमुन, पनीर मसाला, चपाती, पुलाव, अळूवडी, कांदा भजी, रायता, पापड इत्यादी. अहाहा!

जेवणानंतर दोन मुशायरे झाले व नंतर गरमा गरम चहा. मी चहाचे ग्लास भरले तर मा. प्रदीप तळेकर सरांनी प्रत्येकाच्या हातात चहाचा ग्लास दिला. अगदी घरच्या समारंभात करतो तसे. खूप छान वाटले. नंतरचे दोन मुशायरे झाल्यावर फोटो सेशन झाले आणि बरोबर वेळेत कार्यक्रम संपन्न झाला. वेळेचे नियोजन उत्तम प्रकारे झाले. प्रत्येक मुशायरा नंतर सर्व गझलकारांना छान ट्रॉफी, सुंदर अक्षराने नाव लिहिलेले (सरिता कलढोणे) प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह व गुलाबाच्या फुलांने सन्मानित केले गेले.

अखिल भारतीय महिला संमेलन अतिशय सुरेख झाले. त्याचे सर्व श्रेय गझल मंथनचे पदाधिकारी यांना जाते. मा. अनिल कांबळेसर प्रत्यक्ष हजर नव्हते तरी फोन द्वारे संपर्कात होते. काहींनी प्रत्यक्ष हजेरी लावली. बऱ्याच जणांशी फक्त व्हाट्सअप्प वरच बोलणे झाले होते, त्यांना आता भेटून खूप आनंद झाला. माहेरची माणसे भेटली की आनंद होतो तसाच प्रकारचा आनंद व समाधान वाटले. देवकुमार सर, जयवंत वानखडे सर, शाम खामकर सर,, डॉ. मंदार खरे, Adv. मुकुंदराव जाधव, प्रदिप तळेकर इत्यादी. अजून बरीच नावे आहेत. असाच स्नेह भाव सदैव राहो ही सदिच्छा.

आज पर्यंत अनुभवलेल्या संमेलनापैकी गझल मंथनचे कालचे संमेलन कायम लक्षात राहण्यासारखे होते. त्यांचे कारण म्हणजे अतिशय सुंदर नियोजन. सांगितलेल्या वेळेत सुरूवात व समाप्ती व अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम होते. अतिशय सुरेख!! संपूर्ण गझल मंथन टीम व पुणे कार्यकारणीचे कौतुक करावे तितके थोडेच!!

माहेरवाशीण माहेराहून परत येताना बॅगा भरून येते तसेच मी दिवाळी अंक, गझलयात्री संग्रह, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाबफूल व कायम टिकेल असे गझल मंथनचे आजीवन सभासदाचे

identity card घेऊन आले. भाऊ जसा बहिणीला घरी पोचवतो त्याच प्रमाणे प्रदीप तळेकर भाऊनी आपल्या कारमधून मला व इतरांना घरी पोचवले. सध्या मी माझ्या मुलीकडे पुण्यात राहत असल्याने संमेलनात सहभागी होऊन आनंद घेता आला.

 

शोभा वागळे

मुंबई (पुणे)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा