You are currently viewing स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या कर्ज वितरण आणि ठेवीत पहिल्या ८ महिन्यात लक्षणीय वाढ – ॲड.दीपक पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या कर्ज वितरण आणि ठेवीत पहिल्या ८ महिन्यात लक्षणीय वाढ – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :

 

स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सहकार खात्याने घालून दिलेले आदर्श निकष पुर्णांशाने पूर्ण करत सातत्याने अग्रेसर होत आहे, अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली. कोव्हीड कालखंडात व नंतर एक वर्ष संस्थेच्या कर्ज वितरणामध्ये लक्षणीय घट दिसून आली होती.

*वेगवान कर्ज वितरण*

मात्र एप्रिल २०२३ पासून आज अखेर पर्यंत संस्थेचे येणे कर्ज २०८ कोटी पल्याड गेले असून पहिल्या आठ महिन्यात संस्थेने लक्षणीय वाढ नोंदवत २६ कोटींनी कर्ज व्यवहार वाढवला असून हि कर्ज वितरणातील वाढ १४.२८% इतकी लक्षणीय आहे.

 

*प्रभावी वसुली*

कर्ज वितरण वाढत असताना ही पतसंस्थेने ऑक्टोबर अखेर ९९.३१% इतके लक्षणीय प्रमाण वसुलीचे राखण्यात यश प्राप्त केले आहे.

*ठेविंचा सातत्याने वाढता ओघ*

कर्ज वितरण वाढत असताना संस्थेच्या ठेवी ही २९५ कोटींची सिमा ओलांडून ३०० कोटींकडे झेपावत आहेत. एप्रिल २०२३ पासून नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यात पतसंस्थेकडे तब्बल ३० कोटी ४० लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या. ठेवीमध्ये ८ महिन्यात ११% वाढ नोंदली गेली.

*निधी व रिझर्व्ह*

गेल्या ८ महिन्यात संस्थेचे निधी व रिझर्व्ह ४३ कोटी ५९ लाखांवर पोचले असून आठ महिन्यात निधी व रिझर्व्हमध्ये ५ कोटी ६६ लाखांची लक्षणीय म्हणावी अशी वाढ झाली आहे ही वाढ १४.९४% इतकी लक्षणीय आहे. आज पर्यंत पतसंस्थेने आपल्या ८ शाखा स्वमालकीच्या कार्यालयात प्रस्थापित केल्या आहेत. त्याचवेळी पतसंस्थेकडे इमारत निधी पोटी २१ कोटी निधी असून गतवर्षी पेक्षा हा निधी ३ कोटींनी वाढला आहे.

संस्थेच्या गंगाजळी ११ कोटींवरून १३ कोटींपर्यंत पोचली आहे. निर्माण केलेल्या सर्व निधी व रिझर्व्हच्या रक्कमेची १००% स्वतंत्र गुंतवणूक धोरणानुरूप केलेली असून ही सर्व गुंतवणूक बँकांमध्ये आहे. आपल अर्थकारण सशक्त करत नेताना न्यू टेक्नॉलॉजी फंड, तारण सोने किमंत चढ उतार निधी, न्यू ब्रँच स्थैर्यता निधी, व्याजदर चढ उतार निधी इत्यादी विविध निधी उभारले आहेत. संस्थेच्या योजनांची जाहिरात प्रभावी करता यावी यासाठी संस्था प्रसार व विकास निधी ही संस्थेने निर्माण केला आहे.

*गुंतवणुका*

प्रत्येक पतसंस्थेला किमान ठेवींच्या २५% रक्कम हि गुंतवणूक करावी लागते. स्वरूपानंद संस्थेने १३२ कोटी ८८ लाखांची गुंतवणूक विविध बँकांमध्ये केलेली असून सहकार कायदा आणि सहकार खात्याच्या निर्देशात बसतील अशाच बँकांमध्ये ठेवी पोटी ही गुंतवणूक करण्यात आली आहे.

संस्थेचे कर्ज ठेवीचे प्रमाण ६१.७३% असून भांडवल पर्याप्तता प्रमाण २५.३५% इतके लक्षणीय आहे. स्वरूपानंद पतसंस्थेने गतवर्षी ६ कोटी ६३ लाखाचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. त्यामध्ये वृद्धी होत यावर्षी संस्था ७ कोटी निव्वळ नफा प्राप्त करेल या दृष्टीने प्रयत्न सुरू असून उर्वरित ४ महिन्यात अधिक वेगाने व्यवसाय वृद्धी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

आर्थिक निकषांची आदर्शपणे पूर्तता हि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची खासियत आहे. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, नव तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकाभिमुख सेवा देत पतसंस्था अत्यंत सातत्याने अग्रेसर होत आहे आणि संस्थेने आर्थिक शिस्त राखल्यानेच ठेवीदार तसेच कर्जदार पतसंस्थेकडे सातत्याने सलंग्न होत आहेत.असे मत ॲड.दीपक पटवर्धन, अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 2 =