You are currently viewing भविष्यात लोकसभा आणि तिन्ही विधानसभा उमेदवार भाजपाचे असणार – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

भविष्यात लोकसभा आणि तिन्ही विधानसभा उमेदवार भाजपाचे असणार – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

ओरोस :

आज जाहीर झालेल्या ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात भाजप पक्षाने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या २२ पैकी १५ सरपंच भाजपचे निवडून आलेले आहेत. ही लोकसभेच्या विजयाची नांदी असून भविष्यात लोकसभा आणि तिन्ही विधानसभा उमेदवार भारतीय जनता पक्षाचेच असणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात श्री सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी जेष्ठ पदाधिकारी राजू राऊळ उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. सावंत यांनी जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील दोन सरपंच बिनविरोध झाले होते. तर २२ सरपंच व सदस्य पदांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. आज त्याची मतमोजणी झाली. या निकालात भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. २२ पैकी १५ सरपंच भाजपचे निवडून आले आहेत. मालवण तालुक्यातील आचरा सारख्या मोठ्या ग्राम पंचायत वर भाजपने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला केवळ पाच सरपंच निवडून आणता आले असून दोन ठिकाणी गाव विकास पॅनल सरपंच निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, मोफत धान्य योजना आणि विश्वकर्मा योजना या तळागाळात पोहोचविण्यात यशस्वी झाल्याने तसेच हर घर संपर्क अभियान यामुळे हे यश मिळाले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चांगले काम सुरू असल्याची ही पोहोच पावती आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली मतदार संघात आ नितेश राणे, कुडाळ मतदारसंघात निलेश राणे आणि सावंतवाडी मतदार संघात राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या गेल्या. जेष्ठ नेते प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा