You are currently viewing शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून हजारो युवकांना स्वयंसिद्ध करण्याचं उद्दिष्ट – दीपक काळीद

शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून हजारो युवकांना स्वयंसिद्ध करण्याचं उद्दिष्ट – दीपक काळीद

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

शनिवार ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता बाळासाहेब भवन, मंत्रालयाच्या जवळ कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. त्याचं निमित्तही तसंच होतं. शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईच्या बैठकीसाठी खास निमंत्रित केलं होतं.

बैठकीची सुरूवात शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांच्या प्रस्तावनापर मनोगताने झाली. ४५ वर्षांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याच्या जोरावर आज शिव उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना एका जबाबदारीची जाणीव आहे, राज्यातल्या हजारो युवकांना स्वयंसिद्ध करायचं आहे. त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वयंसिद्ध करायचं आहे. त्यासाठीच आज आपण सारे एकत्रित आलो आहोत. आजच आपण काही समित्या गठीत करणार आहोत. त्यातल्या प्रत्येकाने वर्षभरात किमान ५० जणांसाठी रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सहाय्य करावं. इतकंच नाही तर त्यानंतरही पुढील वर्षभर आढावा घेऊन त्यांच्या पाठीशी शिव उद्योग संघटना कायम असल्याचं आश्वासक चित्र निर्माण करावं.

अध्यक्ष पुढे म्हणाले, डिसेंबर महिन्यापासून आपण आपलं स्वतःचं मासिक अथवा पाक्षिक प्रसिद्ध करणार आहोत. त्याचं नाव ‘शिव उद्योग’ असणार आहे. प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याचा वापर आपण आपल्या प्रत्येक सदस्याला यशस्वी करण्यासाठी करणार आहोत. प्रत्येक व्यवसाय यशस्वी होण्यासाठी विपणन क्षेत्र अतिशय महत्त्वाचे ठरते. शिव उद्योगच्या प्रत्येक सदस्याचा त्याच्या व्यवसायात विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यात आपल्या उद्योजकांच्या, विविध सेवा पुरवठादारांच्या, महिला रोजगार, स्वयंरोजगाराच्या संबंधी मुलाखती प्रसिद्ध करणार आहोत. तसेच व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी व्यक्तींचेही मार्गदर्शनपर लेख यात असतील. जाहिरातीच्या माध्यमातूनही आपण आपला व्यवसाय सर्वदूर पोहोचवू शकणार आहोत. बरोबरीने समाज माध्यमांची साथही मिळणारच आहे. त्याचबरोबर नववर्षाची दिनदर्शिका आपण तयार करत आहोत. त्यातील जाहिरातींच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरात वर्षभर पोहचणार आहोत.

त्यांच्यानंतर शिवसेना नेते पांडुरंग पाटील यांनी सभागृहाचा ताबा घेतला. त्यांच्या नेहमीच्या संथ, सावध आणि परिणामकारक शब्दांना ऐकण्यासाठी सभागृहात एकच शांतता पसरली. शिव उद्योग संघटनेच्या मार्फत आपण सुरू करत असलेल्या कामावर थेट मुख्यमंत्र्यांचं लक्ष असणार आहे. राज्याचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री जर आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे तर ते सहकार्य आपण का घेऊ नये ? जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हांला सर्व सहकार्य करायला तयार आहे, हा राज्याच्या कार्यक्षम मुख्यमंत्र्यांचा आपल्याला दिलेला शब्द आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आपण पहिला रोजगार मेळावा घेत आहोत, नंतर राज्यात सर्व ठिकाणी आपण मेळावे घेणार आहोत. काही कंपन्या विशिष्ट लेव्हलला ऑनलाइन नोकरी देत आहेत, त्यांना आपल्या कार्यकक्षेत आणण्यासाठी मुख्यमंत्री साहेब मदत करतील म्हणजे पर्यायाने आपले बेरोजगार मेळावे शंभर टक्के यशस्वी होतील.

आपल्याकडची मुलं हुशार आहेत. काहींकडे एखादा व्यवसाय करण्यास सगळी बुद्धिमत्ता आहे. परंतु आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्याला कोणीही मदत करत नाही. बँकांमध्ये तो चकरा मारतो, बँक साथ देत नाही. पण सुदैवाने आज आपले मेळावे होणार आहेत त्यातून नवीन उद्योगपती घडणार आहेत. त्याला कुठले पेपर पाहिजे ते देण्यासाठी, सर्व सहकार्य करण्यासाठी, जिथे गरज पडेल तिथल्या बँकेच्या चेअरमनला शिंदे साहेब स्वतः फोन करतील आणि त्यांना कशाप्रकारे तुम्हांला मदत करायची आहे ते सांगतील.

आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात. एक पुरुषांची आणि एक महिलांची राज्यस्तरीय समिती निर्माण होणार आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे की माझ्यामुळे या स्वयंरोजगार मेळाव्याला कुठेही गालबोट लागणार नाही. मी करत असलेलं काम हे आत्मविश्वासाने कतेन. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेलं काम, काळीद सरांना अपेक्षित असलेलं काम आपण करणार आहोत याची आपण शपथ घेऊया.

समिती प्रमुख म्हणून राजेंद्र यादव (रोजगार मेळावा), हनुमंत ताम्हणकर (महिला रोजगार मेळावा), राजेंद्र खोसे (बँकिंग आणि फायनान्स), गोकुळ लगड (ॲग्रो इंडस्ट्रीज) आणि प्रकाश ओहळे (मिडीया, मार्केटिंग) यांची नेमणूक करण्यात आली.

कार्यक्रमाच्या दरम्यान सिद्धेश्वर लक्ष्मण चिखले यांनी रोजगार मेळाव्यावर, ज्योती प्रदीप देशमुख यांनी बचत गटांवर, महेश कुलकर्णी यांनी युपीएससी/ एमपीएससी बद्दल तसेच गोकुळ लगड यांनी ॲग्रो इंडस्ट्रीजबद्दल आपले अनुभव सभागृहासमोर मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा