You are currently viewing विश्वचषकातील सर्वात मोठ्ठया विजयासह भारत उपांत्य फेरीत

विश्वचषकातील सर्वात मोठ्ठया विजयासह भारत उपांत्य फेरीत

*श्रीलंकेला ५५ धावांत गुंडाळले*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (२ नोव्हेंबर) श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी २००७ मध्ये बर्म्युडाचा २५७ धावांनी पराभव केला होता. भारताचा पुढील सामना आता रविवारी (५ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

 

विश्वचषकातील एकूण सर्वात मोठ्या विजयाबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. ह्याच विश्वचषक स्पर्धेत त्यांनी दिल्लीत नेदरलँड्सविरुद्ध ३०९ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकात आठ विकेट गमावत ३५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ५५ धावांवर गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची ही त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच आशिया चषकात ते ५० धावांत सर्वबाद झाले होते.

 

या विश्वचषकात भारताचा हा सलग सातवा विजय आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यांना आता दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा सात सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांना आता बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यानंतरही इतर देशांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

 

भारतीय वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजाला टिकू दिले नाही. जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला पायचीत टिपले. या धक्क्यातून श्रीलंकेचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ बळी घेतले. मोहम्मद सिराजने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

 

शमीने या विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या. तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्याकडे आता वर्ल्ड कपमध्ये ४५ विकेट्स आहेत. त्याने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले. झहीर आणि श्रीनाथ यांनी प्रत्येकी ४४ विकेट घेतल्या. शमीला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

 

श्रीलंकेच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडून कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी १२ धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, दुशन हेमंथा आणि दुष्मंथा चमीरा खाते उघडू शकले नाहीत. त्यांच्यासह आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

 

याआधी भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला दिलशान मदुशंकाने त्रिफळाचीत बाद केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी केली. मधुशंकाने ही भागीदारी तोडली. त्याने नर्व्हस नाइन्टीजमध्ये शुभमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिसद्वारे झेलबाद केले. शुभमन ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर विराटचे शतकही हुकले. मधुशंकाने त्याला निसांकाकरवी झेलबाद केले. विराटने ९४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ८८ धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने ४६ चेंडूत ६० धावांची शानदार भागीदारी केली. राहुल १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या. मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने २४ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. भारतीय डावातील शेवटच्या चेंडूवर जडेजा धावबाद झाला. श्रीलंकेकडून मधुशंकाने पाच, तर चमीराला एक विकेट मिळाली.

 

विश्वचषकात कोणत्याही संघाविरुद्ध डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला पायचीत टिपले. निसांकानंतर श्रीलंकेचा दुसरा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्नेही बाद झाला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर करुणारत्नेला मोहम्मद सिराजने पायचीत बाद केले. श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही.

 

विश्वचषकात श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. पथुम निसांकापूर्वी लाहिरू थिरिमाने आणि दिमुथ करुणारत्ने यांच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. २०१५ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर थिरिमाने बाद झाला होता. त्यानंतर करुणारत्ने २०१९ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तंबूमध्ये परतला होता.

 

श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर आठ वर्षांनंतर विश्वचषकात खातेही न उघडता बाद झाले. भारताविरुद्ध करुणारत्ने आणि निसांका शून्यावर बाद झाले. २०१५ मध्ये लाहिरू थिरिमाने आणि तिलकरत्ने दिलशान यांना अफगाणिस्तानविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते.

 

एकदिवसीय इतिहासातील ही चौथी वेळ आहे जेव्हा संघाचे दोन्ही सलामीवीर खाते उघडू शकले नाहीत. २००६ मध्ये हे पहिल्यांदा घडले. वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वेचे सलामीवीर पीट रेन्के आणि टेरी डफिन शून्यावर बाद झाले. २०१५ मध्ये श्रीलंकेच्या थिरिमाने आणि दिलशान यांना अफगाणिस्तानविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते. २०१९ मध्ये, न्यूझीलंडचे कॉलिन मुनरो आणि मार्टिन गुप्टिल वेस्ट इंडिजविरुद्ध शून्यावर तंबूमध्ये परतले होते.

 

श्रेयस अय्यरने ह्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. त्यासाठी त्याने ४९ सामने खेळले. हा टप्पा जलद पार करणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्याने नवजोतसिंग सिद्धू आणि सौरव गांगुली ह्यांना मागे टाकले. त्यांना प्रत्येकी ५२ सामन्यांनंतर हा टप्पा गाठता आला होता. शुभमन गिलने हा टप्पा केवळ ३८ सामन्यांमध्ये गाठला आहे. तर शिखर धवनने ४८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

 

या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी पाहून विश्वचषकात सहभागी झालेला प्रत्येक संघ घाबरला असेल. तर लोकेश राहुलने या सामन्यात उत्कृष्ट यष्टिरक्षण केले. बुमराह, सिराज आणि शमीचे चेंडू ज्या पद्धतीने येत होते, ते काम कोणत्याही यष्टीरक्षकासाठी कठीण होते, पण राहुलने उत्कृष्ट यष्टिरक्षण केले. त्याने लेग स्टंपच्या बाहेर शमीचा एक चेंडू पकडला. अंपायरने तो वाइड घोषित केल्यावर, राहुलने रोहितला एकट्याने रिव्ह्यू घेण्यास पटवले आणि शेवटी भारताला एक विकेट मिळाली. ही विकेट शमीच्या खात्यात गेली, पण त्यात राहुलचा संपूर्ण वाटा होता.

 

मोहम्मद शमीने पुन्हा एकदा पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. या विश्वचषकात त्याने तीन सामन्यांत १४ विकेट घेतल्या आहेत. शमी जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या १४/४ होती आणि त्याला गोलंदाजीनंतर श्रीलंकेची धावसंख्या ४९/९ होती. शमीने पाच षटकात १८ धावा देत पाच बळी घेतले. त्याने विश्वचषकामध्ये भारतासाठी एकूण ४५ विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय खेळाडू आहे.

 

जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत श्रीलंकेसाठी हा सामना जिंकणे कठीण असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर सिराजनेही पुढच्याच षटकात दोन बळी घेत भारताचा मोठा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले. अखेर शमीने पाच विकेट घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

 

भारतासाठी या सामन्यातील सर्वात आनंददायी बाब म्हणजे संघाच्या कमकुवत दुव्याने चांगली कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत केवळ दुसऱ्यांदा प्रथम फलंदाजी केली आणि चांगली धावसंख्या केली. पहिले सहा सामने जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची कसोटी लागली नाही. भारताने इंग्लंडविरुद्ध छोटी धावसंख्या उभारली होती, पण गोलंदाज डोंगराएवढे सिद्ध झाले होते.

 

भारताकडून शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारली नव्हती. या सामन्यात श्रेयस आणि गिलची शतके हुकली, तर जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये वेगवान धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. डेथ ओव्हर्समध्ये श्रेयस-जडेजाने तुफानी फलंदाजी केली. अशा स्थितीत टीम इंडियाची प्रत्येक कमजोरी दूर होताना दिसत आहे.

 

आशिया चषकापासून लोकेश राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जवळजवळ प्रत्येक सामन्यात, तो मधल्या फळीत येतो आणि आवश्यकतेनुसार फलंदाजी करतो आणि बहुतेक प्रसंगी तो सामना संपल्यानंतर किंवा संघाला अडचणीतून बाहेर काढल्यानंतरच बाद होतो. या सामन्यात त्याची बॅट चालली नाही, पण आतापर्यंत खराब फटके खेळून विकेट बहाल करणाऱ्या अय्यरने शानदार फलंदाजी केली. त्याने सुरुवातीला आपला वेळ घेतला आणि त्याची नजर स्थिरावल्यानंतर मोठे फटके खेळायला सुरुवात केली. अय्यरने ५६ चेंडूत सहा षटकार आणि तीन चौकार लगावले. सलग दोन षटकार मारून तो बाद झाला. त्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या षटकांमध्ये भरपूर धावा केल्या.

 

रवींद्र जडेजाने या सामन्यात चांगली फलंदाजी केली. ४८व्या षटकात श्रेयस बाद झाला आणि तोपर्यंत जडेजा १४ चेंडूत १४ धावा करून खेळत होता. यानंतर त्याने वेगाने धावा करत १० चेंडूत २१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झाला.

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + seventeen =