You are currently viewing संतांचे विचार आणि आचार हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे मूलस्त्रोत – विजय चौकेकर

संतांचे विचार आणि आचार हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे मूलस्त्रोत – विजय चौकेकर

आचरा :

 

“संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांचे विचार, यांच्या अभंगरचना हेच खरे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मूलस्रोत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आदींनी आपल्या विचारांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. तेच प्रबोधन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग करीत आहे,” असे उद्गार विजय चौकेकर (जिल्हा संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग) यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी आयोजित ‘विज्ञानाची कास धरा’ या प्रबोधनपर व्याख्यानात काढले.

यावेळी व्यासपीठावर श्री. अशोक कांबळी (अध्यक्ष), जे. एम् . फर्नांडिस, सुरेश गावकर (उपाध्यक्ष), प्रकाश पुजारे (खजिनदार), बाबाजी भिसळे (सल्लागार), लक्ष्मण आचरेकर (संस्थापक सदस्य) बी.एफ. फर्नांडिस (सहसचिव), श्रीम. मनाली फाटक (महिला प्रमुख) आदी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन श्री. अशोक कांबळी यांनी त्यांचें स्वागत केले.

आपला विषय पटवून देताना चौकेकर म्हणाले, “जादूटोणा विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. संविधानाने दिलेल्या देश आणि धर्म याविषयी दिलेल्या अधिकारा विरोधात हा कायदा कधीही जाणार नाही‌. वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात रुजविल्यास जगण्याची नवी दिशा मिळते. आत्मविश्वास वाढतो‌.” ज्यावेळी बुवाबाजीचा पर्दापाश करणारे अनेक प्रयोग दाखल्या दाखल सादर केले.

यावेळी कथामाला मालवणच्यावतीने रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या वतीने स्मृतीचिन्ह, ग्रंथभेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश ठाकूर, सदानंद कांबळी, श्रुती गोगटे, सुगंधा गुरव, नवनाथ भोळे आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते. आचरे येथील जवळजवळ ७० ज्येष्ठ नागरिकांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांचे समवेत आनंदकुमार धामापूरकर(उपाध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग), संदीप धामापूरकर (सदस्य)हे अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा