You are currently viewing कोजागरी निमित्त १७४ वे कवी संमेलन थाटात संपन्न

कोजागरी निमित्त १७४ वे कवी संमेलन थाटात संपन्न

“फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या..”

“सच्च्या कार्यकर्त्यांच्या म्हणून तर चळवळी मोडल्या..”

अशी चळवळी विषयींची भावना अध्यक्षीय भाषणात अनंत कदम यांनी व्यक्त केल्या.

राममनोहर लोहिया उद्यान हडपसर पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी १७४ वे कविसंमेलन आयोजित केले होते.

कदम पुढे म्हणाले. साहित्य सम्राट ही संस्था गेली अनेक वर्षे साहित्य चळवळ राबवत आहे. त्यामुळे ग्रामीण,शहरी, नवोदितांना खुले विचारपिठ सहजच मिळत आहे. अशी चळवळ चालवताना कुणासाठी थांबू नये. नाहीतर उशिरा येणारे भाव खाऊन जातात. त्यांचेच फोटो प्रसिद्ध होतात. या कविसंमेलनास दिग्गज कवी कवयित्री यांनी बागेतील काव्य रसिकांची मने जिंकली. सहभागी झालेल्या कविमध्ये डॉ. पांडुरंग बाणखेले यांच्या कवितेनंतर कविता काळे यांच्या

करायचाच असेल वार तर छातीत कर,

पाठीत नाही.पाठीत वार करणे लढवय्याचा धर्म नाही या कविताने दाद मिळवली. पुढे संजय भोरे यांनी प्रेम विषयाची

उगीचच मी कल्पनातीत राहून जीवाची हूर हूर लावून घेत होतो.

होईल का माझ्या आयुष्याशी तुझी दोरी बळकट याचाच घोर लावून बसलो होतो. कविता सादर केली. त्यानंतर देवेंद्र गावंडे यांनी

छान झोपलो होतो मी डोळे मिटून.

आली माझ्यावर ही बला कुठून.

उठलो झोपेतून खळबळून.

असाच राहील रातभर बसुन

पाठीला माझ्या चावल ढेकूण. ठेकूण ही विनोदी गेय कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रल्हाद शिंदे यांनीतर

गोऱ्या तुझ्या रुपाला भाळतात साले

अन् रंग यौवणाचे ते न्ह्याळतात साले

अशी गझल सादर केली. लगेचच तानाजी शिंदे यांनी खाजगी नोकरीतील वास्तव आपल्या कवितेतून मांडला.

खाजगी नोकरीत पिळवणूक

चुकत नाही कधी कुणाला

नोकरी करावीच लागते शेवटी

मारून तुमच्या मनाला

पुढे चंद्रकांत जोगदंड यांनी

तुह्या रूपाची चांदणी जशी नभी लकाकते

धुंद करूनिया अवनीला हळूच ग खुणावते अशी प्रेम कविता सादर केली.

कवी सीताराम नरके यांनी

खुळ खुळा झाला तुझा ,रोज नवी कहानी

किती गाळशील येड्या,तुझ्या डोळ्यातुन पाणी

ही प्रियकराला प्रेमात सल्ला देणारी कविता सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्त्री जीवनाचा महिमा सांगणारी काव्य रचना सादर केली.

सागरापरी माया असावी हे वाचले

स्त्री तुझ्या मायेने ते शब्द खचले.

अशा विविध विषयांच्या काव्य रचनांना काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फर्त दाद दिली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदिप वनशिव यांनी, कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद अष्टुळ यांनी तर आभार सीताराम नरके यांनी व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा