You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांचा निर्णय अनाकलनीय…

माजी खासदार निलेश राणे यांचा निर्णय अनाकलनीय…

*प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात नेमकं घडलं तरी काय?…*

 

माजी खासदार निलेश राणे यांचे ट्विट ट्विटरवर धडकला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेंचे समर्थक लोकप्रतिनिधी आदींच्या हृदयाचा ठोका चुकला. काल-परवापर्यंत कुडाळ मालवण मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित करून निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातील अनेक गावांमध्ये कितीतरी घरांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यामुळे कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपाचे विधानसभेचे निवडणूक उमेदवार असणार असेच अनेकांना वाटत होते. परंतु निलेश राणे यांनी अचानक ट्विटरवर “मी सक्रिय राजकारणातून बाजूला होत असून आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही. मागील जवळपास 19 / 20 वर्षे आपण मला प्रेम दिलं,कारण नसतानाही सर्व माझ्यासोबत राहिलात. त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. बीजेपी मध्ये मला भरपूर प्रेम भेटलं. बिजेपी सारख्या संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी अत्यंत नशीबवान समजतो. मी एक लहान माणूस आहे आणि राजकारणात मला खूप काही शिकायला मिळालं. काही सहकारी कुटुंबासारखे मनात घर करून राहिले, त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. निवडणूक लढविणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील परंतु जे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ घालविणे मला आवडत नाही. कळत नकळत मी कोणाला दुखावले असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो… जय महाराष्ट्र… जय हिंद…!” अशाप्रकारे ट्विट करून राजकीय सन्यासाची घोषणा केली.

*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात नक्की झाले तरी काय..?*

निलेश राणे हे विधानसभेसाठी कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा गेली काही वर्षे बोलण्यातून ऐकू जात आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिंधुदुर्ग दौरा पार पडला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याबाबतही बोलले होते. परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर केवळ दोन दिवसात निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची केलेली घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात कुडाळ मालवण मतदार संघाची जागा निलेश राणे यांना मिळणार नसल्याची कल्पना दिली गेली असल्याने निलेश राणे यांनी नाराज होत तडकाफडकी निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. पक्ष वाढीसाठी निलेश राणे स्वतः

 

कुडाळ मालवण मतदार संघात उतरून घरोघरी गाठीभेटी घेत पक्ष वाढीसाठी दिवस-रात्र झटत होते. त्यामुळे निलेश राणे हेच कुडाळ मालवण मतदार संघातील भाजपचे उमेदवार असतील अशी अटकळ जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि भाजपाच्या मतदारांनी बांधली होती. त्यामुळे निलेश राणे यांचा अचानक बदललेला निर्णय याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौराच कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्या कुडाळ मालवण मतदार संघातून आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात पराभूत झाले होते, त्याच कुडाळ मालवण मतदारसंघात पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्या विरोधात उभे राहून कुडाळ मालवण विधानसभेची जागा भाजपाच्या पारड्यात घालून आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची निलेश राणे यांची इच्छा होती. परंतु देवगड कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे कनिष्ठ चिरंजीव नितेश राणे हे भाजपाचे आमदार आणि पुढील विधानसभेसाठी उमेदवार आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभेच्या जागांपैकी दोन जागा एकाच कुटुंबाला देणे गैरसोयीचे होणार असल्याने कुडाळ मधून भाजपचे तिकीट मिळणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे निलेश राणे यांचे समर्थक, त्यांनी कुडाळमधून अपक्ष निवडणूक लढवावी यासाठी आग्रही असल्याचे समजते. परंतु देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपाचे प्रदेश चिटणीस असलेले निलेश राणे अपक्ष लढणार तरी कसे..? हा प्रश्न उभा राहिल्याने नाराजीतून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असावी. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली तरी भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठीची योग्य तडजोड झाल्यास निलेश राणे कुडाळ मालवण मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढतील की नाही..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा