You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र डॉ. निलेश राणे यांची राजकीय निवृत्ती…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र डॉ. निलेश राणे यांची राजकीय निवृत्ती…

कुडाळ:

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा कुडाळ मालवण मतदारसंघाचे भाजपा विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी अचानक दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ट्विट करत आपण सक्रिय राजकारणातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या निलेश राणेंनी राजकारणातून बाहेर पडण्याची केलेली निर्णयामागे कारण काय? अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

*माजी खा.निलेश राणे यांनी केलेल्या ट्विट मध्ये…*

नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! असे म्हटले आहे.

त्यामुळे अचानक या निर्णयाने कोकणातील असंख्य निलेश राणे समर्थक कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. कुडाळ मालवण विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी करणाऱ्या निलेश राणे यांनी असा निर्णय घेण्यामागचे कारण काय ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा