You are currently viewing डॉ. शीतल आमटे यांच्या खोलीतून विषारी इंजेक्शन आणि गोळ्या जप्त…

डॉ. शीतल आमटे यांच्या खोलीतून विषारी इंजेक्शन आणि गोळ्या जप्त…

वाद शमल्यानंतरही आत्महत्या केल्याने गूढ कायम

चंद्रपूर : 
पोलिसांनी डॉ. शीतल आमटे यांच्या खोलीतून दोन विषारी इंजेक्शन आणि मोठय़ा प्रमाणात औषध, गोळ्या जप्त केल्या आहेत. आमटे कुटुंबातील वाद शमल्यानंतर डॉ. शीतल यांनी स्वत:ला खोलीत बंद करून घेत आत्महत्या केली, त्यामुळे त्याबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर रात्री त्यांचे पार्थिव स्व. बाबा आमटे यांच्या समाधीशेजारी दफन करण्यात आले. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असले तरी मागील काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या, ही बाब आमटे कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक केलेल्या एका पत्राद्वारे मान्य करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितेश पांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आत्महत्येच्या वेळी शीतल यांनी खोलीचे दार आतून बंद केले होते. त्यांचे पती गौतम शेजारीच कार्यालयात काम करीत होते. सासू-सासरे वरोरा येथेच खासगी रुग्णालयात गेले होते, तर सहा वर्षांचा मुलगा हा अंगणात खेळत होता.

कार्यालयातील काम संपवून गौतम खोलीकडे गेले. तेव्हा खोलीचे दार आतून बंद होते. त्यांनी खिडकीतून बघितले असता शीतल बिछान्यावर पडून होत्या. शंका येताच त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला. आजूबाजूला इंजेक्शन व गोळय़ा होत्या. त्यानंतर लगेच शीतल यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नागपूर येथून आलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने इलेक्ट्रॉनिक साहित्य तथा आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेतल्याची माहिती डॉ. पांडे यांनी दिली. आमटे व करजगी कुटुंबाने सध्या तरी कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असून सत्य बाहेर येईल, असे दोन्ही कुटुंबांनी म्हटल्याची माहिती डॉ. पांडे यांनी दिली. आमटे कुटुंबातील वादावर पडदा पडला होता आणि आता सर्व काही सुरळीत होणार होते तर मग शीतल यांनी आत्महत्या का केली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन अहवाल वरोरा पोलिसांना सुपूर्द केला आहे. मंगळवारी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आमटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

समस्या सुटल्याचा संदेश, तरीही..

आमटे कुटुंबीयांनी सार्वजनिक केलेल्या एका पत्रामुळे उद्भवलेल्या वादावर तोडगा निघाला होता. त्याबाबत स्वत: शीतल यांनी जवळच्या मित्रांना संदेश पाठवून कळवले होते. ‘समस्या सुटली. भाऊ कौस्तुभ आमटे हा महारोगी सेवा समितीचा पदाधिकारी राहील आणि त्याच्याकडे मूलजवळील सोमनाथ प्रकल्पाची जबाबदारी सोपवली जाईल’, असे या संदेशात लिहून या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले होते. दरम्यान, डॉ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनीही सोमवारी डॉ. प्रकाश आमटे यांना सकाळी १०.३० वाजता ‘धन्यवाद’ असा संदेश पाठवला. मात्र त्यानंतरच्या एका तासातच शीतल यांनी आत्महत्या केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =