*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पल्लवी उमेश कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
(२) दुसरी माळ………
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।
|| द्वितीय देवी ब्रह्मचारिणी नमस्तुभ्यम ||🙏
“दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा”॥२॥
अर्थ…..
अतिशय अवघड तपश्चर्या केल्या नंतर फळ प्राप्ती देणारी देवी ब्रह्मचारिणी आम्हां सर्वांना आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देवो..🙏
आज काल या मोबाईल मुळे वाचन संस्कृती लयास जाते की काय असे वाटते. पूर्वी अधाशा सारखी मी पुस्तक अक्षरशः खायची …एकदा वाचायला बसले की संपवूनच उठायची .. पुस्तकातला किडाच म्हणा न….पण आता पुस्तक लायब्ररी घरी पाणी भरतेय…पण वाचायला वेळ नाही…का तर हा मोबाईल….आता सुध्दा त्यावरच लिखाण करतेय…अगदी जीवनाचा अविभाज्य भागच झालाय म्हणा न…!
असो…सांगायचा मुद्दा हा, की आता मोबाईल वरून गुगल सर्च करताना मला रामायणातील उर्मिला भेटली. कैकयी आणि कौसल्या माताही.
उर्मिला म्हणजे सीता ची धाकटी बहीण आणि लक्ष्मण याची बायको. जसे लक्ष्मण याचे रामावर प्रेम होते, तसेच हिचे सीतेवर प्रेम होते. हिंदू धर्मात पतिव्रता मध्ये हिचे नाव अग्र स्थानी आहे . महान स्त्रियांमध्ये हीची गणना होते हे आपल्याला माहीत आहे .
असे का?…याचे उत्तर शोधताना मला असे आढळले, की ज्यावेळी लक्ष्मण राम आणि सीतेसह वनवासाला निघाले, तेव्हा उर्मिला त्याच्याबरोबर येण्यास तयार होती. परंतु त्याने संकोच केला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तिला अयोध्येत थांबायला सांगितले. असे म्हणतात की मग जेंव्हा लक्ष्मण वनवासात जाताना तिचा निरोप घ्यायला आले,तेंव्हा ती राणी वेशात नटून थटून सामोरी आली.तेंव्हा लक्ष्मण प्रचंड संतापला व तिला कैकयीची उपमा देऊन अपमानित केले पण उर्मिलेला तेच हवे होते,कारण आपला तिरस्कार केला, आपल्या पासून लक्ष विचलित झाले, तरच आपल्या भावाची आणि वहिनीची उत्तम काळजी हे घेऊ शकतील.
ज्यावेळी वनवासात राम सीता आणि लक्ष्मण शिक्षा भोगत होते…त्या १४ वर्षाच्या काळात लक्ष्मण एक रात्र ही न झोपता भावाचे व वहिनीचे रक्षण करत होता. निद्रादेवीच्या वरा मुळे हे शक्य झाले होते ..पण ही झोप कुणाला तरी देणे क्रमप्राप्त होते म्हणून ती जबाबदारी उर्मिलेने स्वीकारली होती…म्हणून उर्मिला रात्री स्वतः ची झोप घ्यायची आणि दिवसभर लक्ष्मण याची रात्रीची झोप पूर्ण करायची .म्हणून उर्मिला या अतुलनीय बलिदानासाठी उल्लेखनीय आहे, ज्याला ‘उर्मिला निद्रा’ म्हणतात.
किती तो त्याग…आणि नवरा असून नसल्यासारखे हे १४ वर्षाचे जगणे.
माझ्यासाठी ती एक आदर्श पतिव्रता आहे.
आज समाजात आपण अशा अनेक स्त्रिया बघतो ज्यांचे पती देशसेवेसाठी सीमेवर लढत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, कारण भविष्य माहित असताना सुद्धा या स्त्रिया त्यांना आपले पती म्हणून स्विकारतात…एवढेच नव्हे तर आपली मुले सुध्दा त्या देशसेवेसाठी तयार करतात. या सुद्धा उर्मिले पेक्षा कमी नाहीत.सलाम अशा स्त्रियांना.
मला अशा स्त्रियांना सुध्दा सलाम करायचा आहे या निमित्ताने, की ज्यांचे पती संसार अर्ध्यावर सोडून कायमचे निघून गेलेत . काही वर गेले , तर काही घटस्फोट देऊन गेले…..पण या स्त्रिया न हारता परत समाजात ताठ मानेने उभ्या राहतात. आपल्या पायावर उभ्या राहतात. मुलांना चांगले संस्कार देत कुटुंबाला सावरतात… काही एकट्या राहतात आणि स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करतात….आज या समाजात स्वबळावर ठाम पणे सन्मानाने समाजात उभ्या आहेत.कष्ट करत आहेत.
आज विधवा महिलेला ‘ विधवा’ म्हणायचे म्हणजे, हे कोत्या मनाचे लक्षण मानले जाते. आज अशा भगिनी स्वत:ला पूर्वीसारखे कोंडून न घेता बाहेर पडत आहेत, समाजात मिसळत आहेत ..आणि समाज ही विशेषत: समाजातील प्रत्येक स्त्री तिचा आदर करत आहे ..ही समाजाची झालेली मोठी प्रगती आहे..क्रांती आहे. तिला हात देऊन समर्थपणे बरोबरीने कार्यरत आहेत.आज समाजाचा समाजाकडे बघण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन मोडत, समाज प्रगति कडे वाटचाल करत आहे ..आणि हा शिक्षणाचाच प्रभाव आहे..स्त्री शिक्षित झाल्याने विचारांची नवीन दिशा ती स्विकारत , आत्मसात करत आहे .
पूर्वी विधवा किंवा घटस्फोटीत महिलांची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक पडत आहे . आज घरचे, सासरचे या मुलींसाठी परत एकदा लग्न लावून तिला स्थिरता देत आहेत ..हा समाजातील बदल निश्चितच कौतुकास्पद आहे.
समाज चांगला आणि वाईट दोन्ही ही प्रकारचा आहे…दोन्ही प्रकारचे अनुभव या स्त्रिया घेतात. काही तोंड दाबून सहन ही करतात, काही विरोध दर्शवुन मुकाबला ही करतात…ही लढाई ती एकटी स्त्री भोगत असते….पण जगायचं कसं हे शिकत जाते…. पावला पावलावर विकृत नजरांचा सामना करते ती…पण हार मानत नाही…
आज या स्त्रियाच आपला आदर्श आहेत. या आपल्याला उर्मिलेची आठवण करून देणाऱ्या आहेत, म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
अशा या स्वतंत्र पण एकट्या जीवन जगणाऱ्या, तसेच ताठ मानेने स्वाभिमानाने समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या, असंख्य माता भगिनींना ही दुसरी माळ मी अर्पण करते….
‘अबला नहीं, हम सब सबला हैं|
नारी ही हैं, पर सभी चिंगारी हैं||’
“या देवी सर्वभूतेषू तुष्टी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
१६/१०/२३