You are currently viewing “आत्महत्या कि पलायनवाद”??

“आत्महत्या कि पलायनवाद”??

आधुनिक तंत्रज्ञान, भौतिक सुखांची आस,झटपट श्रीमंतीचा ध्यास,जीवघेणी स्पर्धा अशा एक ना अनेक कारणामुळेच माणूस चंचल,अस्थिर आणि बधीर बनलाय.सुखाची नेमकी कल्पना समजून न घेतल्यानेच तो या जीवघेण्या चक्रात रुतलेला आहे.आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
एखाद्याने चिठ्ठी लिहून ठेवली तर त्यावरून नंतर होणाऱ्या कायदेशीर बांजूंची चिरफाड करण्यासाठी किंवा मरणारा स्वखुशीने मेला.आत्महत्या केली.प्रत्येक आत्महत्येला वेगवेगळे कंगोरे असतात.कुणी कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या करतो,कुणी गरीबीला कंटाळून हा मार्ग पत्करतो.कुणी निराशेच्या गर्दीत गेल्याने आत्महत्या करतो.प्रेमभंग हे सुद्धा कारण असू शकतं. आईबाबांनी सेलफोन दिला नाही म्हणून अवघ्या सहा वर्षाचा मुलगाही असा अविवेकी मार्ग स्विकारतो.पबजी खेळतो म्हणून बाबा ओरडले तर पर्याय आत्महत्या.सेलीब्रेटी,राजकीय नेते यांच्या आत्महत्येमागे चर्चेत असणारी आणि चर्चेत नसणारीही कारण असतात.
पण मागच्या काही दिवसातं सगळ्यात हाय व्होल्टेज आत्महत्या म्हणजे सेलीब्रेटी सुशांतसिंगची आत्महत्या..ती हत्या कि आत्महत्या यासाठी देशातील सगळ्या तपासयंत्रणा कामाला लागल्या. सर्वपक्षीय नेत्यांनी हत्या कि आत्महत्या यावर रणकंदन माजवलं.काही चँनेलने अहोरात्र या एकाच विषयावर फोकस करून वातावरण तापत ठेवल…या सगळ्याचा परिणाम देशाच्या,राज्याच्या आणि विशेषतः आर्थिक राजधानी मुंबईच्या दैनंदिन जीवनावर झाला.महाभयंकर कोरोनाच्या उपाययोजना ऐवजी राजकीय फड रंगू लागले…शेवटी निष्पन्न काहीच नाही.
पण कालची नंदनवन मधील डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या ही मनाला चटका लावणारी आणि या देशातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला चिंतन आणि चिंता करायला लावणारी आहे.याबाबत समाजमाध्यमात मी एक पोस्ट वाचली..त्यावर व्यक्त होताना एका बुद्धीजीवी नेटकऱ्याने अशी प्रतिक्रिया दिली की,”हा पलायनवाद”आहे.असं व्यक्त होण आणि शाब्दिक खेळ करणं फारचं सोप असत.जी व्यक्ती या भळभळत्या जखमा घेऊन जगत असते त्या वेदना त्यालाच माहीत असतात. राजकारणात आरोप- प्रत्यारोप झाले तर सहसा कुणी लक्ष देत नाही… आणि ज्यांच्यावर ते होतात ते सुद्धा त्याचा कधीच विचार करत नाहीत.. एवढी ती आता सहज प्रक्रिया झालेली आहे.मात्र जेव्हा प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यावर असे बेछूट आरोप होतात तेव्हा ती व्यक्ती हतबल होते.अशावेळी ज्यांना आपण जवळचे समजतो किंवा कधीकाळी आपण त्यांच्या उपयोगी पडलेलो असतो ही मंडळी नुसती चर्वण करत असतात .अशावेळी कुणीही पुढे येत नाही. ज्याच्या बाबतीत हे घडलेलं असत त्यालाच हे सगळ फेस करायचं असतं.अनेक सामाजिक विषय हाताळले असले तरी मानवी मनाचा एक हळवा कप्पा त्यालाही असतो.जगावर हिटलरशाही गाजवणाऱ्या हिटलरने.पण आत्महत्याच केली होती.डॉ. शितल यांनी आपल्या ऐन तारुण्यातील दिवस हे रंजल्या-गांजलेल्यांच्या कल्याणासाठी व्यथित केले.डॉ. झाल्यावर कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी करून ऐष आरामात जीवन जगता आलं असतं पण आमटे घराण्याचे संस्कार असे विचार मनात आणूचं शकत नाही. आमटे कुटुंब म्हणजे या देशातील एक सामाजिक कार्यासाठी अधोरेखित झालेल सोशल विद्यापीठ ज्याची मुहूर्तमेढ ७१वर्षापूर्वी भारतरत्न बाबा आमटे यांनी रोवली.अशा संस्कारक्षम विद्यापीठात जडणघडण झालेल्या डॉ. शितल यांनी उचलेल पाऊल म्हणजे पलायनवाद असे म्हणणे फार चुकीचे आहे.माणूस विवेक हरवतो म्हणजे नेमकं काय करतो.सत्याच्या मार्गाने चालत असताना जर त्याच्यावर असत्याचे प्रहार होत असतील तर अशावेळी तो हतबल होतो..साऱ्या जगाला ओरडून नाही सांगू शकत…नाही हे खोट आहे…अशावेळी अतिरेकी माध्यम पण खरी बाजू समजून न घेता आपल्या टिआरपी साठी धडपडत असतात. आपल्या डोळ्यादेखत सत्य पेटवलं जात आहेत आणि त्याच्या ज्वाळा मला भस्मसात करायला निघाल्यात असा ठाम ग्रह होतो तेव्हा वेगाने मेंदूतील पेशी फक्त एकाच विचाराने उत्तेजित होतात..आता संपवूया सारं..हतबलता परिस्थितीने निर्माण केलेली असते.याला आपण पलायनवाद.कसं म्हणू शकतो..ही गोष्ट सुर्यप्रकाशा इतकी सत्य आहे कि डॉ. शितल यांच्या अकाली जाण्याने कधीही न भरून येणार सामाजिक नुकसान झालं आहे.सेलिब्रेटी,राजकीय नेते यांच्या आत्महत्या या पेक्षा अशा सामाजिक व्यक्तीची आत्महत्या ही मनाला अतीव वेदना देणारी आहे.
…अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 5 =