You are currently viewing अद्भूत

अद्भूत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अद्भूत…*

 

पहाटे पहाटे धुके दाटलेले

दंवबिंदू झेली तृण दाट ओले

अस्पष्ट धूसर अवकाश गूढ

नि:स्तब्ध झाडे नि वेली ही मूढ…

 

किलबिल सारीच ओलावलेली

पडद्यात वाडे घरे झोपलेली

अस्फूट हुंकार वनदेवतेचा

दंवबिंदू झटकत ओला,ओचा…

 

लहरी धुक्याच्या हवेवरी त्या

झुलाच अलगद झुलवत होत्या

धवल पटली नजरेत दूर

घराघरांवर लपकत धूर ….

 

घुंघट धुक्याचा बुरखा जणू तो

नववधूला तो अलगद देतो

किरणशलाका जरतारी मग

सृष्टीस साऱ्या उजळून जातो…

 

अद् भूत सारे पटल धुक्याचे

साम्राज्य पसरे जणू ते मुक्याचे

संवेदना गूढच मनात येती

चराचर सारे धुक्यात न्हाती….

 

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(9763605642)

प्रतिक्रिया व्यक्त करा