You are currently viewing विनायक राऊत यांच्या विरोधात दीपक केसरकर लोकसभा रिंगणात

विनायक राऊत यांच्या विरोधात दीपक केसरकर लोकसभा रिंगणात

राजकिय विशेष

*विनायक राऊत यांच्या विरोधात दीपक केसरकर लोकसभा रिंगणात*

*भाजपा की शिवसेना(शिंदे गट)..?*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा बुद्धिजीवी खासदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, ब्रिगेडियर सुधीर सावंत, सुरेश प्रभू अशा हुशार कर्तबगार खासदारांनी मतदारसंघाची देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ.निलेश राणे यांच्या नंतर विनायक राऊत हे गेली १० वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारून मतदारसंघातील समस्यांवर आवाज उठविला असल्याने सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी अशी लोकांमध्ये त्यांची एक वेगळी छबी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (उबाठा) गटाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यावेळी देखील विनायक राऊत असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकीकडे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार निश्चित झाले असून सत्ताधारी गटाकडून मात्र अजूनही उमेदवार चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. त्यात किरण सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण अशी नावे पुढे येत असल्याने महाविकास आघाडीला आपले घोडे दामटविण्याची संधी मिळत आहे.

काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकर यांनी जो उमेदवार युतीकडून दिला जाईल त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणणार असल्याचे म्हटले असले तरी स्वतः उमेदवार नसणार असेही सांगितले नसल्याने विनायक राऊत विरुद्ध दीपक केसरकर असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत असो वा वैभव नाईक असो दोघांच्याही विजयात आणि निलेश राणे यांच्या दारुण पराभवात दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
नारायण राणे यांच्या विरोधात तब्बल दोन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणीही बोलला नव्हता की त्यांना भिडण्याची कोणी हिम्मत केली नव्हती. तिथे दीपक केसरकर यांनी राणेंना पराभव पाहण्याची वेळ आणली. “राक्षसाचा जीव पोपटात असतो…” अशी कोपरखळी विधाने करत, राणेंच्या दहशतवादाची दिंडोरा राज्यभर वाजवीत राणेंचा पिच्छा पुरवत केसरकर यांनी सिंधुदुर्गातच नव्हे महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आणि एका वर्षात दोन वेळा राणेंना स्वतःचा पराभव पहावा लागला. खासदारकीला त्यांचे चिरंजीव डॉ.निलेश राणे पराभूत झाले. तिथेच दीपक केसरकर किंगमेकर ठरले.
उद्धव ठाकरेंनी केसरकरांना मंत्रिपद दिले, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह व अर्थ राज्यमंत्री खाते देत आपल्या छत्रछायेत ठेवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दीपक केसरकर हे एक शांत संयमी, हुशार तितकेच आक्रमक नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. याच त्यांच्या हुशारीचा उपयोग करून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांवर आपल्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी देत पुढे शिक्षणमंत्री म्हणून नियुक्त केले.

राणेंच्या विरोधात पूर्वी जरी आग ओकली तरी बदलत्या राजकारणात केसरकर राणेंच्या विरोधात बोलत नसून मित्रपक्षांचे नेते म्हणून मैत्रीपूर्ण संबंध जपत असल्याने येत्या निवडणुकीत राणेंना केसरकरांच्या विरोधात न राहता समर्थनार्थ रहावे लागेल. कारण कुडाळ मतदारसंघात डॉ.निलेश राणे यांच्या विजयासाठी केसरकरांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे “तेरी भी चूप और मेरी भी चूप” म्हणून दोघांनाही एकमेकांना पूरक अशी वातावरण निर्मिती करणे हितावह ठरेल.
आज केसरकर महाराष्ट्राच्या राजकारणात पत्त्यातील डावातील एक्क्यासारखे कुठेही वर्चस्व गाजवू शकतात असे धुरंदर बनले असल्याने शिंदेगट त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पुढील लोकसभेचा उमेदवार म्हणून संधी देऊ शकतो. दीपक केसरकर हे देखील तेवढेच ताकदीचे, अफाट बुद्धिमत्ता असलेले प्रतिभावंत उमेदवार आहेत. या मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासाचा नावलौकिक नक्कीच ते राखतील यात तीळमात्र शंका नाही. परंतु आजपर्यंत शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ शिवसेना भाजपा फुटीनंतर भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते या मतदारसंघासाठी आग्रही असून या मतदारसंघातील पुढील उमेदवार भाजपाचाच असेल अशी मागणी केली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना उमेदवारी दिल्यास ते भाजपा की शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार असतील? हा प्रश्न अधांतरी राहिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू साथीदार असल्याने जर केसरकर उमेदवार असतील तर ते शिंदे गटाकडून लढतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे किरण सामंत हे देखील गेले एक वर्षभर खासदारकीच्या उमेदवारी साठी प्रयत्नशील असून त्यांचे बंधू उदय सामंत शिंदे गटातील मंत्री असल्याने त्यांना देखील नाराज करून चालणार नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांच्या विरोधात कोण लढणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे पण ज्यांना संधी मिळेल त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे मात्र निश्चित…!

प्रतिक्रिया व्यक्त करा