उपजिल्हा रुग्णालयालगतची धोकादायक संरक्षक भिंत त्वरित हटवा
सामाजिक बांधिलकी संघटनेचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला निवेदन
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या लगत असलेली संरक्षक भिंत अत्यंत धोकादायक झाली असून त्याच्याखाली अनेक नागरिक तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्या ठिकाणी दुचाकीही पार्क केल्या जातात त्यामुळे भविष्यात अनर्थ घडू नये यासाठी सदरची भिंत त्वरित पाठविण्यात यावी अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, शैलेश नाईक, रवि जाधव आदी उपस्थित होते.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालगतची संरक्षण भिंत धोकादायक असल्याबाबतचे निवेदन पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषद, बांधकाम विभाग, तहसीलदार व प्रांत यांना देण्यात आले होते. परंतु अद्यापही याबाबत कुठचीही कार्यवाही झाली नाही.
सदरच्या भिंतीला लागूनच रुग्णालयात येण्याचा मुख्य रस्ता आहे. तसेच अत्यावश्यक सेवेचा कक्ष असल्याने रुग्णवाहिका येत जात असतात. त्यामुळे प्रशासन सदरची भिंत पडून कोणाचा अपघाती बळी घेण्याची वाट बघत आहे का, असा सवाल या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी अशी अतिधोकादायक भिंत ठेवणे म्हणजे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मृत्यूचा सापळा लावल्यासारखे आहे. परतीच्या पावसामध्ये या भिंतीपासून दुर्घटना होण्याची संभावना आहे. तरी सदरची भिंत त्वरीत पाडण्यात यावी, अशी मागणी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ तर्फे करण्यात आली आहे.