सुधारित संच मान्यतेचे निकष शिक्षक संख्या कमी करणारे :

सुधारित संच मान्यतेचे निकष शिक्षक संख्या कमी करणारे :

 कला-क्रीडा शिक्षकांवरही होणार अन्याय …

शिक्षक भारतीचा शालेय शिक्षण शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे अक्षेप

कासार्डे / दत्तात्रय मारकड :-
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, शिक्षक भारती महाराष्ट्र या राज्यांत संघटनेच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना लेखी निवेदन देतप्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील संच मान्यतेच्या सुधारित निकषांबाबत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.शिक्षण आयुक्त आणि प्राथमिक व माध्यमिकचे संचालक यांनी दिनांक 13 जुलै 2020 रोजी प्रस्तावित केलेले संच मान्यतेचे सुधारित निकष अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडणारे आहेत असा आक्षेप महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने घेतला गेला आहे.

या संघटनेच्या वतीने मांडलेल्या सुधारणा व मागण्या पुढीलप्रमाणे-

शिक्षक भारती संघटनेसोबत झालेल्या बैठकीत आपण शिक्षकांना अतिरिक्त करणारे आणि कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारे 28 ऑगस्ट 2015 व 7 ऑक्टोबर 2015 चे शासन निर्णय रद्द करण्याचे मान्य केले होते. आरटीई आणि महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) कर्मचारी नियमावली 1981 अभ्यास करून प्रत्येक विषयाला शिक्षक देण्यासाठी सुधारित संच मान्यता करण्याचे आश्वासन दिले होते.
शिक्षण आयुक्त यांनी प्रस्तावित केलेले प्राथमिक,उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष शिक्षक संख्या कमी करणारे आणि कला-क्रीडा शिक्षकांवर अन्याय करणारे आहेत.
प्रस्तावित सुधारित संच मान्यतेच्या निकषांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्याध्यापक पदाला विद्यार्थी संख्येची अट न ठेवता शाळा तिथे मुख्याध्यापक देणे आवश्यक आहे. इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक देणे अन्यायकारक आहे. इ. नववी व दहावीसाठी प्रत्येक तुकडीला 1.5 प्रमाणे शिक्षक देणे आवश्यक आहे. आरटीई आणि 1981 च्या कर्मचारी सेवा शर्ती नियमावलीनुसार प्रत्येक शाळेतील किमान संच निर्धारित करणे आवश्यक आहे. इयत्ता नववी व दहावीच्या गटासाठी सहा शिक्षक (मराठी1, हिंदी1, इंग्रजी1, गणित1, विज्ञान1, समाजशास्त्र1) तर इयत्ता सहावी ते आठवीच्या गटासाठी आठ शिक्षक (मराठी1, हिंदी1, इंग्रजी1, गणित1, विज्ञान1, समाजशास्त्र1, शारीरिक शिक्षण1, कला शिक्षक1) आणि इयत्ता पाचवीच्या गटासाठी एक शिक्षक याप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावीच्या शाळेसाठी किमान 15 शिक्षकांचा संच लागतो. मात्र वर्कलोड विभागणी आणि तुकडी मागे दीड शिक्षक या प्रमाणात ही संख्या अकरा पर्यंत येईल. कृपया सर्व माध्यमिक शाळांसाठी किमान 11 शिक्षकांचा (दहा अधिक एक) संच मंजूर करण्यात यावा. त्यापुढील वाढीव तुकड्यांसाठी विद्यार्थ्यांसंख्येच्या प्रमाणात पुढील शिक्षक मंजूर करावेत.

कला (चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन, नृत्य, नाट्य) व क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत विशेष शिक्षक म्हणून स्थान देण्याचे मान्य केले आहे ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु कला-क्रीडा शिक्षकांची गणना मंजूर होणाऱ्या शिक्षक पदाअंतर्गतच करण्यात येणार असल्याने नव्याने विशेष शिक्षक मंजूर होणार नाहीत. तसेच पद रिक्त नसल्यास कार्यभार असूनही विशेष शिक्षक न मिळाल्याने मुलांवर अन्याय होणार आहे. सबब संचमान्यते व्यतिरिक्त 1981 च्या कर्मचारी सेवा शर्ती नियमावलीनुसार किमान 250 विद्यार्थ्यांच्या मागे एक कला, संगीत, क्रीडा शिक्षक स्वतंत्रपणे देण्यात यावेत.
सुधारित संचमान्यतेच्या निकषांत शाळा सुरु ठेवण्यासाठी किमान पटसंख्या निश्चित करताना शहरी, ग्रामीण, आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागांचा विचार करणे आवश्यक आहे. अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी सुधारित निकषांमध्ये कोणताही दिलासा दिलेला नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढ झाल्यावर शिक्षक पद वाढवण्याबाबत विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील सरकारमधील शिक्षण विभागाने संचमान्यतेचे चुकीचे निकष वापरल्याने राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सुधारित संचमान्यता निकष अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढवणारे आहेत.

कृपया सुधारित संचमान्यता निकष रद्द करण्यासाठी तातडीने आदेश दयावेत. आरटीई आणि 1981च्या नियमावलीचा अभ्यास करून प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला क्रीडा शिक्षकांना सन्मान देणारा निर्णय घेण्यात यावा, अशा प्रकारे विविध मागण्या चे निवेदन दिल्याची माहिती शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे-कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, दिलीप निंभोरकर, धनाजी पाटील, संदीप तडस, भाऊराव पत्रे, डॉमनिका डाबरे, कल्पना शेंडे तसेच संजय वेतुरेकर, जालिंदर सरोदे-प्रमुख कार्यवाह, प्रकाश शेळके- कार्यवाह, संगिता पाटील- महिला अध्यक्षा, ज्युनिअर कॉलेज युनिट अध्यक्ष आर. बी.पाटील, शिक्षक भारती उर्दू विभागअध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा