You are currently viewing बी.एस.एन.एल.च्या कारभाराविरोधात लवकरच होऊ दे चर्चा अभियान – आ. वैभव नाईक

बी.एस.एन.एल.च्या कारभाराविरोधात लवकरच होऊ दे चर्चा अभियान – आ. वैभव नाईक

*बी.एस.एन.एल. समस्यांसंदर्भात आ. नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नारायण राणेंना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवतील का?*

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, उद्योग मंत्री दस्तुरखुर्द नारायण राणे असताना देखील गेल्या ९ वर्षात बी. एस. एन. एल. सेवेचा बोजवारा उडाला आहे. मोदींनी अनेक सरकारी कंपन्या, उदयोग व प्रकल्पांचे खाजगीकरण करून बी. एस. एन. एल. ची जागा अन्य नेटवर्क कंपन्यांना देऊन बी. एस. एन. एल. पूर्णतः बंद करण्याचा केंद्र सरकारचा घाट आहे.अंबानी, अदानी यांच्या कंपन्यांच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. बी. एस. एन. एल. च्या समस्यासंदर्भात आज चर्चासत्र आयोजित करून आ. नितेश राणेंनी नेहमीच्या फसव्या भूमिकेप्रमाणे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र केंद्र सरकार कडून बी. एस. एन. एल. ला संपविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि आपले पिताश्री नारायण राणे यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवतील का? असा सवाल उपस्थित करत आमदार वैभव नाईक यांनी लवकरच बी. एस. एन. एल. च्या कारभाराविरोधात होऊ दे चर्चा अभियान राबविणार असल्याचा इशारा दिला.

 

आ.वैभव नाईक म्हणाले, बी. एस. एन. एल. च्या लँडलाईन सुविधा देखील बंद केल्या जात आहे. २०१४ पूर्वी टॉवरच्या ठिकाणी सेक्युरिटी गार्ड ठेवले जात होते. जनरेटर सेवा उपलब्ध असे आता हे सर्व बंद करण्यात आले आहे. टॉवर उभारण्यासाठी भाडे तत्वावर जमीन घेतली जात असे मात्र आता मोफत जागा मिळेल त्याठिकाणी टॉवर उभारले जातात त्यामुळे मोफत जागा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक भागात नेटवर्क मिळत नाही. परिणामी ग्राहक इतर खाजगी नेटवर्क कंपन्यांकडे वळत आहेत. खाजगी कंपन्या याचा फायदा घेऊन भरमसाठ दर आकारून ग्राहकांची लूट करीत आहेत. एकट्या सिंधुदुर्गात बी. एस. एन. एल.चे ३ लाख ग्राहक आहेत. ते आता हळूहळू अंबानींच्या जिओ कडे वळले जात आहेत. खासदार विनायक राऊत यांनी याबाबत अधिकऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या परंतु केंद्र सरकारकडून जाणून बुजून हे केले जात असल्याचे अधिकारी खाजगीत सांगतात. त्यामुळे आ. नितेश राणेंनी बी. एस. एन. एल.च्या येथील अधिकाऱ्यांवर जाळ काढून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा हिम्मत असेल तर केंद्रातील तुमच्या भाजप सरकारला याचा जाब विचारावा असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा