फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहास आज पासून प्रारंभ
फोंडाघाट
फोंडाघाट वासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.राधाकृष्णमंदिरात आजपासून हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या सात प्रहराच्या हरीनाम सप्ताहामुळे गावात व व्यापारांमध्ये उत्साह तसेच चैतन्य निर्माण झाले आहे. संपूर्ण बाजारपेठेत रोषणाई करण्यात आली आहे. या हरिनाम सप्ताहात श्री राधाकृष्ण मंदिरात अखंड वीणावादन करण्यात येणार आहे. तसेच भजन, महिलांसाठी फुगड्या, हळदीकुंकू समारंभ, ढोल ताशांच्या गजरात दिंड्या याचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमामुळे रात्रभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
या निमित्ताने बाहेरगावी उद्योग- नोकरी निमित्त असलेली चाकरमानी- माहेरवाशीणी फोंडाघाटला येतात. गाठीभेटी होतात. स्नेह-जिव्हाळा वाढतो. त्यामुळे अखंड हरिनामात सर्वजण उत्स्फूर्त सहभाग घेतात. गावातील वेगवेगळ्या संस्थांचेही योगदान या कार्यक्रमात असते. सकाळी झालेल्या घटस्थापनेनंतर कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी संचालक मंडळाला जी मदत लागेल ती आपण करणार असल्याचे सांगितले. फोंडाघाट मधील राधाकृष्णाचे मंदिर हे नाडकर्णी कुटुंबाचे श्रद्धास्थान असल्याने आपसूकच देवळासमोरून जाताना हात जोडले जातात. शंभर वर्षाची परंपरा असल्याने आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असल्याचे नाडकर्णी सांगतात.