You are currently viewing समाजसेवेची मूल्य जपा आणि मोठी स्वप्ने पहा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

समाजसेवेची मूल्य जपा आणि मोठी स्वप्ने पहा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

फोंडाघाट मराठे कृषी कॉलेजचे स्नेहसंमेलन “मृदगंध 2022” कार्यक्रम उत्साहात

कणकवली

फोंडाघाट येथील मराठे कृषी कॉलेज संस्था व जिल्हा प्रशासनाचे ऋणानुबंध जोडलेले आहेत. ज्यावेळी कोविड काळात कोविड सेंटरसाठी जागा देण्यासाठी कोणतीही संस्था पुढे येत नव्हती त्या काळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. नामदेवराव मराठे यांनी स्वतः पुढे येत प्रशासनाला मदत करत आपल्या या संस्थेमध्ये कोविड सेंटर बनविण्यास परवानगी दिली.

एवढेच नव्हे तर माणुसकी जपत येथे येणाऱ्या सर्व रुग्णांची सोय करताना रुग्णांना जेवण व लहान मुलांना नाष्टा स्वखर्चाने दिले होते. त्यामुळे स्वतः नामदेवराव मराठे यांच्या स्मृतीस वंदन करून सांगते की संपूर्ण जिल्हा प्रशासन सदैव आपला ऋणी असेल आणि आता या संस्थेमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी हा एक सुंदर मेसेज किंवा आदर्श म्हणा साहेबांनी घालून दिला आहे की पुढे जाऊन तुम्ही कितीही मोठे व्हा पण जसे या संस्थाचालकांनी समाजसेवेचे भान राखत मूल्य जपले आहे त्याचप्रमाणे तुम्हीही समाजसेवेचे हे मूल्य जपा आणि मोठी स्वप्न पहा असे मार्गदर्शन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट संचलित कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट, श्रीमती सुमती मराठे कृषी तंत्रनिकेतन फोंडाघाट , कै.राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा फोंडाघाट यांच्या संयुक्त विदयमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या मृदगंध 2022 च्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या
दरम्यान यावेळी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष दीपेश नामदेव मराठे, कणकवलीच्या प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, प्राचार्य पंकज संते प्राचार्य जे. जे. राहुल, प्राचार्य पांडुरंग मोहिते ,मंडळाधिकारी दिलिप् पाटील, कायदेशीर सल्लागार मिताली दीपेश मराठे, संचालिका विद्या राणे, फोंडाघाट तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तसेच शैक्षणिक वर्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपेश मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी या आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले की सर्वांनी मोठी स्वप्न पहा आणि कोणीही अपयशाने खचून न जाता पुढे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि ज्याप्रमाणे मॅडमनी स्वतः मोठी स्वप्न पाहत हे यश संपादन केले आहे तसेच तुम्हीही यश संपादन करा. कै. नामदेव मराठे यांनी हे विद्येचे छोटे रोपटे लावताना समाजसेवेचे भान राखले त्यांचा हा वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न करेन असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती दळवी यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा