विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली सुरुवात….
कणकवली
कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू – श्री.रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वयंभू मंदिरात सकाळपासूनच भाविक – भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
जत्रौत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री देव स्वयंभू मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. मंदिरात व मंदिरा बाहेर विद्युत रोषणाई तसेच फुलांनी सजावट करण्यात आली आहे. गेले पंधरा दिवस आधी रात्रौ श्री स्वयंभू मंदिरा भोवती पालखी प्रदिक्षणा सोहळा पार पडला तर आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जत्रौत्सवास सुरुवात झाली.
सकाळी पाषाणाची विधिवत पूजा, काकड आरती, दुपारी रवळनाथ मंदिरातील तरंग वाजत – गाजत स्वयंभू मंदिरात आणण्यात आले. पूजा – आर्चा करून दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने तसेच या यात्रोत्सवाच्या निमित्ताने रात्रौ गाऱ्हाणी, नवस फेडणे, ओटी भरणे आदी कार्यक्रमासोबतच रात्रौ टिपर पाजळून नगरप्रदिक्षणेने सांगता होणार आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर ही दाखल झाले आहेत.