You are currently viewing बाप्पा मोरया

बाप्पा मोरया

*बाप्पा मोरया*

*तुला भक्तिभावे स्मरावा गणेशा*
*मनी भाव भक्ती रुजावा गणेशा*

संपादकीय….

भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी.. याच दिवशी आद्य दैवत पार्थिव श्रीगणेशाची स्थापना करून विधिवत पूजन केले जाते. कोकणात घरोघरी आणि सार्वजनिक असे श्रीगणेशाचे भक्तिभावे पूजन केले जाते. हिंदू धर्मात कोणतेही शुभकार्य असो “विघ्नहर्ता” असे नाव असलेल्या श्रीगणेशाला प्रथम पूजेचा मान असतो. कारण, विघ्न म्हणजे संकट… आणि ते हरण करणारा तो विघ्नहर्ता..!
*”गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया”*
अशा या विघ्नहर्ता श्रीगणेशाचा महाराष्ट्रात साजरा होणारा गणेशोत्सव आज देशात नव्हे तर परदेशात देखील मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात साजरा केला जातो. श्रीगणेशाचे आगमन होणारा क्षण उत्साहाने भारलेला असतो..वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीेत गणरायाला घरी आणलं जातं. कोकणात पूर्वी वाहन व्यवस्था सक्षम नसताना डोईवरून गणेश मूर्ती गणेश शाळेतून आणल्या जायच्या. कोकणात चिकन मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची प्रथा पूर्वंपार चालत आलेली असून मातीच्याच मूर्ती घरोघरी पुजल्या जातात. अलीकडे वजनाला हलक्या म्हणून शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या जातात. काही मुर्तीकारांनी गोमय म्हणजे गाईचे शेण व माती यांचा वापर करून गणेश मूर्ती साकारल्या आहेत. परंतु आकर्षक रंगसंगती आणि वजनाला हलक्या म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती काही ठिकाणी बनवतात, पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळत नाहीत, तर अनेक मूर्ती समुद्र किनाऱ्यांवर भग्नावस्थेत पडलेल्या सापडतात हे मात्र दुर्दैवी…!
वक्रतुंड विघ्नेशाला घरी आणल्यानंतर दारावरच घरची लक्ष्मी त्याला ओवाळते, अगरबत्तीचा टीका विकटाच्या कपाळी लावते अन् हसत हसत त्यांचं स्वागत करते. गणेशाच्या स्वागताची घरात जोरदार तयारी सुरू असते. गणेशाच्या आसनाच्या वरती श्रावण भाद्रपद महिन्यात फुलणाऱ्या विविध फुले, पाने, फळांनी मंडपी सजवली जाते. त्यात आम्रतरूच्या छोट्या छोट्या फांद्या (टाळे), पिवळी धम्मक फुललेली हरने, आईनफळे, कवंडळ, नारळ, सुपारी, काकडी, तेरडा, नरमाची फळे अशी अनेक प्रकारची रानफुले, फळे बांधून मंडपी सजवली जाते. गणेशाला विराजमान करण्यासाठी टेबलावर चौरंग मांडला जातो. श्रीगणेशाला चौरंगावर विराजमान केलं जातं. गणेशाच्या शेजारी हळदीचे रोप, तेरडा आदी झाडांच्या स्वरूपात गौरी विराजमान होते अन् झाडावरून उतरून काढलेला असोला नारळ म्हणजे महादेव, महागणपती आदींना बसविले जाते. रंगबिरंगी दीप दिव्यांची आरास केली जाते. दोन्ही बाजूला दोन समई प्रज्वलित करून प्रसन्नभावे पार्थिव श्रीगणेशाची विधिवत मंत्रोच्चारांनी पूजा केली जाते.
एकदंताला चौरंगावर विराजमान करून विधिवत आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, फुले, पत्री आणि नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी पूजा करतात. विनायकाच्या आवडीची लाल जास्वंद फुले, शमी, दूर्वा, बेल, आघाडा आणि विविध प्रकारची एकवीस पत्री भालचंद्र चरणी वाहतात. कृष्णपिंगांक्षाला ओल्या नारळाच्या खोबऱ्यात गूळ, वेलची इत्यादी घालून केलेल्या उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. मोदक बाप्पाला अतिप्रिय आहेत. यावेळी बाप्पाचे वाहन असलेल्या मूषक म्हणजे उंदीर महाराजांना देखील श्रीगणेशाच्या बाजूलाच स्थापित केले जातात.
गजवक्राचे आगमन म्हणजे जणू सुवर्ण सोहळाच..! बालगोपालांचा आनंद तर गगनात मावत नसतो..

*शंकर आणि पार्वती…*
*मांडीवर बसलाय गणपती..*
*टुकुमुकु बघतोय चांगला..*
*आमच्या पप्पांनी गणपती आणला…*
असा गाण्याचा सूर धरून आपल्याच धुंदीत फटाके फोडून तर कधी भजनात ताल सूर धरून गणेशोत्सवाची मजा लुटतात. रोजचे जेवण म्हणजे हमखास काहीतरी खास.. कधी काजू बदाम घातलेली शेवयांची खीर अन् कधी दूध आटवून तयार केलेली स्पेशल बासुंदी. वरण भात, बटाट्याची भाजी, काळ्या वाटाण्याची आमटी, भेंडी, दोडका, पडवळ आणि आंबाडे घालून केलेली अळूची भाजी म्हणजे लज्जतदार जेवणाचा बेत पोट तुडुंब भरून टाकतो.
कोकणातील गणेशोत्सव म्हणजे वाड्यावाड्यातील लोकांनी रात्रभर घरोघरी फिरून केलेली भजने आणि आरती मधून ओसंडून वाहणारा भक्तिभाव…! पाऊस असो वा किर्र काळोख, शेताच्या बांधावरून, नदी नाले पार करून सुद्धा प्रत्येक घरात धूम्रवर्ण गणेशासमोर भजने, आरती केल्या जातात. भजन मंडळाला खाण्यासाठी करंज्या, लाडू अन् उसळ…! आता द्रोण मधून दिल्या जाणाऱ्या उसळी पेक्षा पूर्वी झाडाच्या पानांच्या द्रोण मधून दिल्या जाणाऱ्या उसळी मध्ये चव असायची, एक विशिष्ट असा गंध असायचा. ती मजा काही औरच असायची. आता दिला जाणारा वडा पाव सुद्धा त्या उसळी समोर “किस झाड की पत्ती”…! ज्याच्या घरी भजनाला जायचं त्याने पेटी (हार्मोनियम) डोक्यावरून न्यायची, भिंतीला टेकून भजनाला बसायचे नाही, पान खाऊन भजनाला बसायचे नाही तर तोंडातून आवाज आला पाहिजे, आपल्या घरातील भजन झाल्यावर झोपायचे नाही, अन्यथा उद्या तुझ्याकडे कोणी येणार नाहीत.. कुणाच्याच परड्यातील तवशी (काकडी) काढायची नाहीत.. असे एक ना अनेक मजेशीर नियम भजन मंडळांचे. मुंबईकर चाकरमानी हे प्रत्येक घरात आकर्षण असायचे, आस्थेने चाकरमानी बाबुची चौकशी व्हायची. कुणाचे गणपती दीड तर कुणाचे पाच दिवस, गौरी गणपती, किंवा अकरा दिवसांचे, अनंत चतुर्दशीला विसर्जन होतात. विसर्जनाच्या दिवशी म्हामदे म्हणजे महाप्रसादाला शेजारी पाजारी, मित्र मंडळींची पंगत बसते.. अन् सायंकाळी *”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”* अशी विनवणी करत वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत लंबोदर, विघ्नराजेंद्रला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा