“अश्वमेध”च्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत निवड
मालवण
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ॲम्युचर ऍथलेटिक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत आचरेच्या अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा विद्यार्थ्यांची डेरवण (ता. चिपळूण) येथे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस कवायत मैदान येथे रविवारी १४, १६, १८, २० वयोगटातील मुला- मुलींच्या १००, २००, ४००, ६००, १५००, ३०००, ५००० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, थ्रो बॉल आदी मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष रणजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव कल्पना तेंडोलकर, एनआयएस प्रशिक्षक ताराचंद पाटकर आदी प्रशिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
ऍथलेटिक प्रकारातील स्पर्धांमधून विजेते ठरलेल्या प्रथम दोन क्रमांकाना राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या १६ वर्षाखालील वयोगटातून मेघा सातपुते हिने २०० व ४०० मीटर धावणे प्रकारात अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक, वैभवी मिराशीने १०० मीटर धावणेमध्ये प्रथम, विनय जंगले याने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर १४ वर्षाखालील वयोगटात गार्गी पवार हिने गोळाफेकमध्ये द्वितीय, राकेश शेठ याने ६० मीटर धावणेमध्ये प्रथम तर आशीर्वाद सातपुते याने ६०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
२० वर्षाखालील वयोगटात प्रथमेश पुजारे ५ किमी प्रकारात प्रथम व ४०० मीटरमध्ये द्वितीय तर मयुरेश पुजारेने ४०० मीटरमध्ये प्रथम व भालाफेक मध्येही प्रथम क्रमांक प्राप्त केला. २० वर्षाखालील वयोगटातील स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. ‘अश्वमेध’ च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थापक सिद्धेश आचरेकर, प्रशिक्षक अनिकेत पाटील (एनआयएस), ओंकार धुरी, स्वाती आचरेकर यांनी अभिनंदन केले आहे. विजेते स्पर्धक आचरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.