You are currently viewing आमदार दीपक केसरकर करणार नगरपालिका प्रशासनाशी चर्चा….

आमदार दीपक केसरकर करणार नगरपालिका प्रशासनाशी चर्चा….

गेले अनेक महिने मुंबईत असलेले दीपक केसरकर काहीच दिवसांपूर्वी सावंतवाडीत येऊन गेले. परंतु कोरोनाच्या काळात मतदारसंघात सर्वच विकासकामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे केसरकर यांच्याबाबत नाराजी वाढली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. सध्यस्थितीमध्ये केसरकर यांच्याकडे विधानसभा विशेष हक्क समितीचे अध्यक्षपद आहे. आज केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारपासून ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत व विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
दुपारी दोन वाजता वेंगुर्ला येथील दौरा आटोपून साडे चार वाजता सावंतवाडीत आगमन होणार असून साडे पाच वाजता सावंतवाडी पालिका प्रशासनाशी विकासकामा संदर्भात चर्चा करणार आहेत. गेले काही महिने सावंतवाडी नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सावंतवाडी भाजी मार्केट मधील स्टॉल हटाव, भाजी मार्केटच्या जागी मॉल उभारणीची घोषणा, शहरात अनधिकृतपणे उभे राहत असलेले स्टॉल, वड्यावाड्यांमध्ये खोळंबलेली विकासकामे, पालिकेतील मुख्य अभियंत्यांची झालेली निवड आणि तद्नंतर मंजुरी न मिळाल्याने मुख्य अभियंता हे पद रिक्त असल्याने शहरात विकास कामांना खीळ बसली आहे. पालिकेत चाललेला एककल्ली कारभार आणि त्यानुसार प्रशासन सुद्धा त्यांच्या मागेच ओढत जात असल्याने सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहराची होत असलेली बदनामी, पालिका प्रशासनाचा सुरू असलेला ढिम्म कारभार या सर्वच विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालिकेतून केसरकर यांची सत्ता गेल्यावर गेल्या ११ महिन्यात शहरात नजरेस पडावे असे एकही विकास काम झालेलं नाही. सत्ता येण्यासाठी सावंतवाडीकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आश्वासनांची खिरापत वाटली होती. परंतु सत्ता मिळविल्यानंतर मात्र दिलेली आश्वासने हवेत विरल्याने आश्वासने देणे सोपे असते परंतु ती प्रत्यक्षात उतरविणे किती कठीण असते हे सावंतवाडीकरांनी अनुभवले आहे. सावंतवाडी पालिका म्हणजे पोरखेळ झाल्यासारखेच सावंतवाडीकरांना वाटत असून सावंतवाडी पालिकेतील सत्ता एकवेळ विरोधी गटाच्या हातात जाऊ देऊन केसरकर यांनी शहरवासीयांना विरोधकांचा सुद्धा अनुभव घ्यायची संधी दिल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
आमदार दीपक केसरकर आजच्या सावंतवाडी पालिकेतील भेटीत प्रशासनाशी नक्की काय चर्चा करतात आणि त्यांची पुढील रणनीती काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा