*वीज ग्राहक संघटना सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन*
*अनेक गावातील तक्रारींचा देखील वाचला पाढा*
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सव कालावधीत अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी करणारे निवेदन सावंतवाडी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना देण्यात आले.
सावंतवाडी शहरासह तालुक्यातील कित्येक गावांमध्ये वीजेच्या अनेक समस्या आहेत. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांना लागणारी झाडे तोडणे, जुनाट असलेले, सडलेले पोल बदलणे, जुन्या ट्रान्सफॉर्मरची देखभाल दुरुस्ती करणे, गावांमधून होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा त्यामुळे नादुरुस्त होणारी विजेची उपकरणे, शेती पंप न चालणे, शेतातून रस्त्याने जाणाऱ्या वीज वाहिन्यांना गार्डींग करणे, अशा कितीतरी समस्यांचा पाढा संघटनेच्या माध्यमातून उपकार्यकारी अभियंता यांच्यासमोर वाचण्यात आला. गणेशोत्सवाच्या पूर्वी योग्य ती उपाययोजना करण्याची ग्वाही उपकार्यकारी अभियंता यांनी दिली. बांदा येथील सहा.अभियंता यादव ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत नसल्याची तक्रार अनेकांनी मांडल्याने जिल्हा पातळीवरून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी, सचिव संजय नाईक, सहसचिव दीपक पटेकर, व्यापारी संघ तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, जिल्हा समन्वयक बाळ बोर्डेकर, पुंडलिक दळवी, राजू सावंत, अनिकेत म्हाडगुत (सावरवाड), सुनील देसाई(डेगवे), मल्हार(निरवडे), तेंडोलकर(मळगाव), अमित राऊळ (माडखोल), उल्हास सावंत(इन्सुली) आदी वीज ग्राहक संघटना सदस्य उपस्थित होते.