प्रामाणिक काम हिच खरी देशसेवा- कॅप्टन विलास सावंत
वैभववाडी
समाजातील प्रत्येकांने आपापले काम प्रामाणिकपणे करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अभ्यासेत्तर उपक्रमात प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशसेवा आहे असे प्रतिपादन कॅप्टन विलास सावंत यांनी केले.
माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगाव येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचा जिल्हास्तरीय प्रथमसत्र प्रशिक्षण कार्यक्रम आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्र.संचालक डॉ.कुणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कॅप्टन विलास सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्र.संचालक डॉ.कुणाल जाधव, संस्थेचे अध्यक्ष व उद्घाटक कॅप्टन विलास सावंत, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, विभागाचे जिल्हा क्षेत्र समन्वयक डॉ.राजेंद्र मुंबरकर, प्रा.श्री.एस.एन.पाटील, प्रा.एम.ए. ठाकुर, प्रा.यशोधन गवस व प्रा. यु. टी. परब विभागाचे प्रा.डॉ.सचिन राऊत व प्रा.किरण पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुंबई विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पूर्वी प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार विभाग म्हणून ओळखला जाणारा विभाग आता आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग म्हणून कार्यरत आहे. या विभागामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. स्वतःबरोबर समाज परिवर्तन करण्याची संधी मिळणार आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. समीर तारी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
गेली अनेक वर्षे या विभागाचा विस्तार कार्य शिक्षक व क्षेत्र समन्वयक म्हणून काम केले आहे. विद्यापीठाची ध्येय धोरणे शिक्षक या विस्तार कार्य विद्यार्थांमार्फत समाजात पोचविण्याचे कार्य करीत असतो असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी सांगितले.
आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग हा मुंबई विद्यापीठाचा उपक्रम महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी प्रिय होत आहे. या उपक्रमातून राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाच्या तळागाळापर्यंत जाण्याची संधी मिळते. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे डॉ. कुणाल जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
तसेच त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण-२०२०, कौशल्य विकास (SD), पर्यावरण शिक्षण (EE) व नागरिक जबाबदारी (CS) या नवीन प्रकल्पांची माहिती दिली.
जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा.एस.एन.पाटील यांनी लोकसंख्या शिक्षण प्रकल्प (PEC) व ग्राहक मार्गदर्शन प्रकल्प (CGP) या प्रकल्पांची माहिती दिली. प्रा.एम.ए.ठाकुर यांनी करियर प्रकल्प (CP) व अन्नपूर्ण योजना (APY) प्रकल्पांची माहिती दिली. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी औद्योगिक प्रशिक्षण प्रकल्प (IOP) यावर मार्गदर्शन केले. प्रा.
यशोधन गवस यांनी सर्वांसाठी शिक्षण (EFA) तर प्रा.यु.टी.परब यांनी सर्वे संशोधन (SR) या प्रकल्पाची माहिती दिली.
या प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयातील ३८ विस्तार कार्य शिक्षक व ४८ विद्यार्थी व्यवस्थापक उपस्थित होते. सर्व सहभागी प्रतिनिधींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिद्धी कांबळी यांनी केले तर विद्यार्थी व्यवस्थापक कु.वैभवी बुकम हिने सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे विस्तार कार्य शिक्षक प्रा. पद्माकर शेटकर, प्रा.ठाकूर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.