You are currently viewing फूल उमलताना

फूल उमलताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*फूल उमलताना*

 

मी एक गोष्ट सांगते तुम्हाला.

दोन शेजारी होते. एक निवृत्त शिक्षक आणि दुसरा तरुण बँकर. एक दिवस ते दोघं एका नर्सरी मधून काही झाडांची रोपे आणतात. ती रोपे आपापल्या अंगणात लावतात. निवृत्त शिक्षक रोपांना अधून मधून पाणी घालत असत. रोपांची जेवढी घ्यायची तेवढी काळजी ते घेत असत. तरुण बँकर मात्र रोपांना रोज रोज भरपूर पाणी घालत असे. त्यामुळे त्याची रोपे अधिक हिरवीगार आणि टवटवीत असत. निवृत्त शिक्षकाचीही रोपे वाढतच होती मात्र दर्शनी पाहता बँकरची रोपे अधिक आकर्षक भासत होती.

 

एकदा काय झालं अचानक तुफान आलं आणि त्या तुफानात बँकरची वाढलेली हिरवीगार रोपं उन्मळून गेली. मात्र निवृत्त शिक्षकाची रोपे तुफानाचा सामना करत ताठ उभी होती.

“हे कसं?”

बँकरला प्रश्नच पडला.

” मी तर माझ्या झाडांना रोज पाणी घालत होतो. किती काळजी घेत होतो! ”

त्यावेळी शिक्षक त्याला म्हणाले ,”अति पाणी घातल्याने, अति काळजी घेतल्याने तुझी रोपे बाह्यांगी वाढली पण त्यांच्या मुळांना काहीच ताण न मिळाल्यामुळे ती जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात पसरलीच नाहीत. म्हणून तुफान आल्यावर अशी उन्मळून पडली. याउलट माझी झाडे स्वयंपूर्ण बनली. जास्त पाणी न मिळाल्यामुळे जमिनीत त्यांची मुळं पाण्याच्या शोधात खोलवर रुजत गेली आणि जमीन पकडून राहिली.”

 

मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना नेमकं हेच घडतं. त्यांना जे हवं ते, जेव्हां हवं तेव्हां मिळत गेलं, त्यांचे प्रत्येक हट्ट लाडा कौतुकाने किंवा अतिरिक्त भावनेने पूर्ण होत गेले तर मुलं स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनू शकत नाहीत. त्यांच्यात स्वतः काही मिळवण्याची जिद्दच निर्माण होऊ शकत नाही किंवा मिळवण्यासाठी स्वतः काही धडपड करण्याची त्यांची इच्छा, क्षमताच खुंटून जाते आणि अशा वातावरणात वाढल्याचे पडसाद पुढच्या आयुष्यात गंभीरपणे उमटू शकतात. प्रचंड नैराश्य, उदासीनता, अकार्यक्षमता, कधीकधी गुन्हेगारी वृत्ती, व्यसनाधीनतेला ही मुलं बळी पडू शकतात. त्यामुळे मुलांना घडवताना पालकांनी आपली मुले जबाबदार कशी होतील याचा प्रथम विचार करायला हवा. जबाबदारी आली की स्वातंत्र्य येते आणि आत्मविश्वास बळावतो.

 

मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं ही खूप संवेदनशील बाब आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल सर्वगुणसंपन्न असलं पाहिजे, जगातलं जे जे बेस्ट ते त्याला मी मिळवून देईन पण त्याला “द बेस्ट चाइल्ड” चा पुरस्कार हा मिळालाच पाहिजे. कधी कधी तर मुलांच्या यशात आई-वडील आपलंच स्टेटस शोधत असतात आणि अगदी लहानपणीच एक स्पर्धात्मक व्हायरस त्यांच्या जडणघडणीच्या काळात तेच ढकलतात. सुरुवातीला जरी चित्र देखणं वाटत असलं तरी काळा बरोबर हळूहळू त्याचे रंग उडू लागतात. त्यातूनच एक तर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा विद्रोहाची भावनाही उफाळून येऊ शकते. पण याची जाणीव जेव्हां होते तेव्हां खूप उशीर झालेला असतो.

 

डॉक्टर गेनोट हे उत्तम बालमानसशास्त्रज्ञ. त्यांनी एक संकल्पना मांडली.

*व्हॉइस आणि चॉईस*

मुलांना बोलू द्या, त्यांना निवडीचा हक्क द्या, त्यांना काय हवंय हे सांगण्याचे स्वातंत्र्य द्या. म्हणजेच एकीकडे मुलांना शिस्त लावताना,वळण लावतानाच मुलांशी संवाद कसा होईल याची दखल घेणे हे जरुरीचं आहे. ज्या घरात मुलांशी संवाद असतो, ज्या घरातली मुलं आपली मतं मांडू शकतात… ती अधिक धीट, धाडसी आणि आत्मनिर्भर होतात. एक गोष्ट कधीही विसरू नये की लहान मुलालाही स्वतःचं असं मत असतं. अगदी दोन महिन्याचं मूल ज्याला बोलून व्यक्त होता येत नाही ते रडून, गोंधळ घालून आपल्या मनासारखं करून घेतच की नाही? प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी असते.

 

पहिलं मूल घडवताना तर आई-वडिलांची खरोखरच तारांबळ उडते कारण तेही प्रथमच पालक झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या पालकत्वात कुठेतरी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचं बालपण आणि त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांची एक भूमिका दडलेली असते. शिवाय बदलत्या काळानुसार आजूबाजूच्या जगाबरोबर मुलाला वाढवताना मनात खूप गोंधळ उडालेला असतो. पुस्तकी ज्ञानाचाही प्रभाव पडलेला असतो आणि कधी कधी आपलंच मुल आपणच ओळखण्यात कमी पडू शकतो.

मला आजही आठवतं, माझी मुलगी पाच सहा वर्षाचीच असेल. मी तिला काहीतरी करायला सांगितलं. थोडक्यात एक जॉब दिला मी तिला. ती नाही म्हणाली नाही. पण थोड्यावेळाने माझ्यासमोर दोन्ही हात सरळ करून ताठ उभी राहिली आणि म्हणाली,

” मम्मी चिमणीला पोहता येईल कधी ?आणि बदक हवेत उडू शकेल का?”

बापरे! प्रचंड हादरले होते मी तेव्हां. या एवढ्याशा मुलीत हा विचार आला कुठून? मग मी माझी थिअरी बदलली. मी बेसावध राहिले नाही किंवा तिच्या बाबतीतला सावधपणा सोडला नाही पण तिच्या इवल्या इवल्या मतांनाही मान देत राहिले आणि तिच्याशी संवाद साधत, सांभाळत, काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट हे यथाशक्ती दाखवत राहिले.

 

मुलं अत्यंत संवेदनशील असतात तसेच अनुकरणप्रिय असतात थोडक्यात कॉपीबहाद्दर असतात. त्यामुळे पालकांच्या वागण्याचा, बोलण्याचा नकळत प्रभाव त्यांच्या मनावर पडत असतो. शिवाय मुलं निष्पाप असतात. जेव्हां ती काही बोलतात तेव्हा त्यात उद्धटपणा नसतो तर ते फक्त व्यक्त होणं असतं आणि त्यात पालकाच्या वागण्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. ज्यावेळी पालक मुलांना सांगतात “तू हे करू नकोस, हे वाईट आहे. किंवा ही काय भाषा तुझी? कुठून शिकलास?”

अशावेळी एखादं मूल झटकन उत्तर देत.,” तू नाही का त्या दिवशी बोलताना असं म्हणालीस.” अशावेळी पालक निरुत्तरच होतात. म्हणून अशी वेळच येऊ नये याचा पालकांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. अशावेळी स्वत:च्या काही सवयी बदलणं गरजेचं असतं.

 

संस्कार हा ही असाच एक गहन विषय आहे.

“ये रे बाबा मी तुझ्यावर आता संस्कार करते” असा “तुला जेवण वाढते” सदरातील हा विषय नाही. संस्कार हे नकळत घडत असतात आणि ते घडवण्यासाठीचे वातावरण कसे आहे त्यावर त्यांचे चांगलेपण अथवा वाईटपण अवलंबून असते.

 

आणखी एक मुद्दा म्हणजे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न असतात. प्रचंड औत्सुक्य असतं आणि प्रत्येक बाबतीतले असंख्य “का” त्यांच्या प्रवाहात वहात असतात आणि त्यांची उत्तर ते शोधत असतात. अशावेळी,

” तुला नाही कळणार”

किंवा,

“हे करू नकोस”

” अजून तू लहान आहेस”

” याला हात लावू नकोस”

“मोडून ठेवशील”

“अरे पडशील ना..?”

” किती पसारा रे तुझा?”

” आणि हे काय? अशा भिंतीवर रेघोट्या मारून ठेवल्यात.तुला कितीदा सांगायचं?”

ही सारी बोलण्यातली नकारात्मकता आहे आणि ती त्यांच्या ऊर्जेचं खच्चीकरण करत असते.

तुम्हाला एक गंमत सांगते .

माझे पती आर्किटेक्ट आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी एका तरुण जोडप्याच्या बंगल्याचं त्यांनी स्केच केलं. ते तरुण जोडपं ऑफिसात आलेलं असताना माझ्या पतींनी, केलेलं ते स्केच त्यांना दाखवलं. त्यांच्या पसंतीसही उतरलं पण त्यांच्याबरोबर त्यांची छोटी पिंकी ही होती. ती माझ्या पतींना धिटुकलेपणाने म्हणाली,” काका आमच्या या बंगल्यात ना एक पसारा खोली पण करा माझ्यासाठी. आणि अशी एक भिंत ठेवा की जी फक्त माझी असेल आणि मी त्याच्यावर कशापण रंगरेघोट्या काढेन” .

तिच्या या बोलण्यावर त्यावेळी आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. पण मामला गंभीर होता, डोळ्यात अंजन घालणारा होता याचीही जाणीव झाली होती.पालकांच्या नकारात्मकतेला दणका देणारी होती.

 

पण काहींचे पालकत्व मात्र खरोखरच लक्षवेधी असते. अरुण दाते, सुप्रसिद्ध गायक. कुठल्यातरी एका शालेय परीक्षेत ते अगदी शेवटच्या नंबरावर होते. जवळजवळ नापासच होते म्हणाना. घरी येऊन प्रगती पुस्तक कसे दाखवावे ही चिंता त्यांच्या बालमनाला कुरतडत होती. रामू भैया —अरुण दाते यांचे वडील— त्यांनी ते ओळखले आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, “अरे पण तुझ्यासारखं कुणाला गाता येतं का? तिथे तर तुझाच पहिला नंबर आहे ना ?”

या दोन वाक्यांमुळे अरुण दाते सारखा एक महान गायक घडला.

 

आज हा लेख लिहिताना, मागे वळून पाहताना, माझ्या गतकाळातल्या पालकत्वाला निरखत असताना माझ्या कडून पालकत्वाच्या झालेल्या काही चुका मला खूप वेळा भेडसावतात आणि गंमत म्हणजे आई म्हणून माझ्या हातून झालेल्या चुकांची भरपाई नातवंडांच्या बाबतीत करताना माझी मुलगी मला म्हणते,” थांब ग आई! तू आमच्यात आत्ता पडू नकोस. तू ही तर आम्हाला अशीच रागवायचीस ना?”

तेव्हा जाणवतं पालकत्व हा अव्याहत वाहणारा विषय आहे. काळाप्रमाणे बदलणारा आणि शिकवणाराही आहे.शिवाय तो एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणारा प्रवास आहे.एक सूक्ष्म लिंक असते त्यांच्यात. त्यात नेमकं असं काहीही नाही. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक सुजाण पालकत्वाच्या व्याख्याही निराळ्या असतात.

फूल उमलताना कुणी पाहिलं आहे का? पण जमिनीतल्या मुळांशी त्याच्या उमलण्याचं नातं असतं.

 

राधिका भांडारकर पुणे.

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

https://sanwadmedia.com/105608

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

 *वेबसाईट :* 

www.sanwadmedia.com

——————————————————-

 *फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

 *इन्स्टाग्राम पेज :* 

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————- 

 *ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

 *चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =