You are currently viewing मैत्री

मैत्री

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्री*

 

मैत्री…

अर्जुन कृष्णाची,

कृष्ण – सुदाम्याची

मैत्री…राधा कृष्णाची

बासरीतल्या सुरांशी…

 

मैत्री…

पाऊस…ढगांशी,

ढगांची नि आभाळाची

वसंतातल्या बहराशी,

बहरलेल्या …कळी- फुलांशी.

 

मैत्री…

अणू – रेणुंशी

जीवाची – परमात्म्याशी

परमात्म्यातील सगुणाशी

सगुणातील साकार रुपांशी!

 

मैत्री….

धुंद सरी नि पावसाशी

पावसाची नि वाऱ्याची

वारा नि त्या पाखरांची

पाखरं नि ह्या फुलांशी.

 

मैत्री….

सूर- तालाशी

तालातल्या झंकाराशी

शब्दाविना भावनांशी

भावनेतल्या स्पर्शाशी.

 

मैत्री ह्या पुस्तकांशी

पुस्तकातील कथांशी

कथेतल्या कुणा पात्राशी

पात्रांच्या जीवन- घटनांशी

 

मैत्री…..निसर्गाशी

निसर्गातील प्राणीमात्रांशी

प्राण्यातील सृजनशीलतेशी

सृजनाच्या त्या चमत्कारांशी

 

मैत्री…..

त्या चमत्कारांतील दिव्यत्वाशी

त्या सर्वसमावेशक परमेशाशी

सृष्टीच्या निर्मात्याशी

विधात्याशी नि…..

विधात्याने निर्माण केलेल्या चराचराशीही………

 

अशी ही मैत्री, …………

हवीहवीशी…..!

 

योगिनी वसंत पैठणकर

नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा