ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –
शरद पवार यांचे राजकारण (भाग-२)
गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या राजकारणाचा एक अंश आपण दाखवला होता. पण आज ज्या वेळेला एनडीए सरकार एका बाजूला आहे आणि इंडिया हे गटबंधन नव्याने बनलेले आहे. त्यात शरद पवार सामील आहेत. त्यात मध्येच एक अशी परिस्थिती निर्माण झाली की, इंडियाचा घटक पक्ष राष्ट्रवादी फुटली आणि शरद पवार यांचे अनेक निष्ठावंत त्यांना सोडून गेल्याचे दिसले. आता ही घटना शरद पवारांनी केली की खरच शरद पवार यांना राष्ट्रवादीमध्ये विरोध झाला याचा पुढील काळात आपल्याला उलगडा होईलच. पण इतिहासाला साक्ष ठेवून विचार करायचा झाला तर एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की शरद पवार काहीही करू शकतात. ते राजकारणाला राजकारण म्हणून बघतात. त्यासाठी तत्व, जात- पात, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बद्दल सहानुभूती असणे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त यश कुठे आहे ते बघण्याची त्यांची प्रवृत्ती जगजाहीर आहे. ती असू नये असेही आम्ही म्हणत नाही, कारण शेवटी सर्वच पक्ष जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. पण अशा गोष्टींमध्ये शरद पवार काय करतील यावर कुणाचा भरोसा नसतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये इंडियाने शरद पवार यांना जरी बरोबर घेतले असले तरी ते बीजेपी बरोबर जाणार का नाही याबद्दल कोणी खात्री देऊ शकत नाही.
त्यातच नुकत्याच झालेल्या पुण्याच्या कार्यक्रमात श्री. नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळकांच्या नावाने सत्कार करण्यात आला होता. लोकमान्य टिळकांच्या नावाची संघटना त्यांचे नातू चालवतात. त्यांनी नरेंद्र मोदी यांना पारितोषिक देऊन भारतासाठी सर्वात मोठे योगदान केल्याबद्दल सत्कार केला. त्याच दिवशी इंडियाची लोकसभेमध्ये बैठक होती. मणिपूर बद्दल जो विवाद चालू आहे त्या संबंधित इंडियाने लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. त्याबद्दल धोरण ठरवायचं होतं. पण शरद पवार नरेंद्र मोदी यांचे सत्कार करण्यासाठी पुण्याला आले आणि नरेंद्र मोदी यांचे कौतुक देखील केले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले व शरद पवार यांची नीती स्पष्ट झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा शरद पवार यांचा पाठिंबा होता की नाही? त्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण झाला आहे. अशा अनेक गोष्टींमुळे शरद पवार यांच्या बद्दल विश्वासार्हता राहिली नाही आणि ते कुठल्या वेळी काय करतील याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे काँग्रेसची काही नेतेमंडळी उदगारली होती की, शरद पवार यांच्या हातात हात दिल्यावर बोटे मोजावी लागतात. अर्थात हे वक्तव्य काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार विषयी अविश्वासाचा उदाहरण आहे.
मी काँग्रेसमध्ये असताना नेहमी या विषयावर चर्चा व्हायची. सोनिया गांधी परदेशी आहेत, म्हणून शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगवेगळे लढले होते . त्यावेळेला आमच्यासारखा कार्यकर्त्यांनी काँग्रेस वाचवण्यासाठी जीवाचे रान केले होते. मी स्वतः अनेक काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीत जाऊ दिले नाही आणि काँग्रेसमध्येच ठेवले. त्यामुळे एक जबरदस्त ऊर्जा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती व कुठल्याही परिस्थितीत आपण निवडून येण्यासाठी वाटेल ते करायला तयार होते. अंतिमत: निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा काँग्रेसला ८०च्या वर जागा मिळाल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०च्या आसपास सिमित राहिले होते. पण सरकार बनवायचे होते, म्हणून काँग्रेसने शरद पवार बरोबर आघाडी करून सरकार बनवायचा निर्णय घेतला. काही लोकांचा त्याला विरोध होता. तरी अंतिमत: आघाडीचे सरकार निर्माण झाले आणि काँग्रेसची गळती त्या दिवसापासून सुरू झाली. त्याचं कारण असं की मंत्री जे बनले त्यांना पक्षाची फार चिंता नव्हती. पण मंत्रीपद टिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होते आणि बऱ्याच लोकांना वाटायचं की शरद पवारला आपल्या बाजूला ठेवलं पाहिजे तरचं आपलं मंत्रीपद टिकेल आणि जिथे निर्णय घ्यायला काँग्रेस पक्षाला दिल्लीत जायला लागायचं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला या महाराष्ट्रातच निर्णय पटकन घ्यायला संधी मिळायची. अनेक निवडणुका झाल्या. जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली काही ठिकाणी झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने तर बीजेपी बरोबर सुद्धा आघाडी करून काही ठिकाणी निवडणुका लढवल्या. यावरून स्पष्ट होते की, तत्वहीन राजकारणाला सुरुवात झाली. हळूहळू पक्ष दुय्यम ठरत गेला. पक्षाची तत्त्वे नावापुरती राहिली. हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वधर्म संभावती संघटना या सहजच युती आणि आघाडी करून निवडणुका लढवायला लागल्या. या काळात आमच्यासारख्या काही लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, सरकार चालवण्यासाठी युती आणि आघाड्या कराव्या लागतात. पण निवडणूक लढताना मात्र युती आणि आघाड्या करायच्या नाहीत. आमच्या मताला सोनिया गांधींचे नेहमीच समर्थन असायचे. पण पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना युती आणि आघाडीशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही असा धोका वाटायचा. म्हणून पुढे जाऊन सर्व निवडणुकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवण्यात आल्या. त्याचे सर्वात नुकसान काँग्रेस पक्षाला झाले होते. कारण एकीकडे युती करायची, आघाडी करायची पण निवडणुकांमध्ये एकमेकांचे गळे कापायचे.
मी राजकारणामध्ये १९९१ ला आलो ते पण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी. त्यावेळेला राजकारण अगदी वेगळं होतं. मी खासदारकीची निवडणूक ३० हजार रुपयांमध्ये लढलो होतो. पैशासाठी त्यावेळी कार्यकर्ते मागणी करायचे नाही. कारण मी नवीन होतो. पण आता राजकारण पूर्ण बदललेले आहे. जसे नेते मंडळींनी तत्त्वज्ञान सोडून दिले आणि बहुतेक लोक काही अपवाद वगळता फक्त पैशासाठीच काम करतात. कार्यकर्ते हे चुकून तत्व प्रणालीसाठी काम करताना दिसतात. आणि सर्व पक्षातले लोक बऱ्याचदा पैसे नाही मिळाले, तर काम करायचं बंद करतात. ही जी प्रथा सुरू झालेली आहे ती महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाली. ‘भूखंडाचा श्रीखंड’ हा वाक्यप्रचार राजकारणाचा मुख्य मुद्दा झाला आणि विरोधी पक्षाने देखील तो उचलून धरला. त्यावेळेला खैरनार आणि अण्णा हजारे यांची आंदोलन सुरू झाली होती. सुधाकर नाईक हे माफियाच्या विरोधात युद्ध करत होते. त्यांना बदनाम करण्यात आले, दंगली घडविण्यात आल्या. मुंबईत प्रचंड दंगल झाली. सुधाकर नाईक यांना अकार्यक्षम ठरवण्यात आले. त्यावेळेला सैन्य दलाला दंगल मिटविण्यासाठी जवळ येऊ सुद्धा दिले नाही. मग मुख्यमंत्र्यांना काढून डिफेन्स मिनिस्टर असलेले शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याची तयारी दाखवली व हे मुख्यमंत्री पुन्हा झाले आणि माफिया विरोधातली चळवळ थांबली.
आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. हे राजकरणात सिद्ध झालेले आहे. म्हणून राजकरणी लोक एकमेकांना सांभाळून घेतात. पण आता हे सर्व बदललेले आहे. आता सत्तेचा वापर एकमेकाला नामोहरण करून आपल्याकडे यायला भाग पाडणे, नाहीतर व्यक्तिगत दुश्मनी असह्य होते. मला सांगण्यात आल की लोकसभा लढवण्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये लागतात आणि विधानसभा लढवण्यासाठी ५० कोटी लागतात. त्यामुळे प्रचंड पैसा असला तरच निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे तुम्ही भ्रष्टाचारी असल्याशिवाय निवडणूक लढवणे शक्य नाही. आता तर तलाठ्यापासून सर्व अधिकारी प्रचंड श्रीमंत झालेत. कारण त्यांना बदल्यांसाठी आणि विशिष्ट जागा मिळविण्यासाठी प्रचंड पैसा मोजावा लागतो. एका मध्यम अधिकार्याने सांगितले की त्याने ९० लाख रुपये देऊन बदली करून घेतली. तर प्रत्येक अधिकारी जर पैसे देऊन बदली करून घेत असेल तर शासकीय यंत्रणा सामान्य माणसांसाठी कशी राबेल. त्यामुळे भ्रष्टाचाराची ही कीड इतकी पसरली आहे की लाच दिल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न आहे. अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाले. मग त्यांना सोडून दिले. आता त्यांचे २ मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास राजकारणावरून उडाला आहे. पण राजकारणाशिवाय देश चालू शकत नाही. त्यामुळे राजकारणाला शिव्या देण्यापेक्षा ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९