You are currently viewing २०० व्या टी २० सामन्यामध्ये भारताचा पराभव

२०० व्या टी २० सामन्यामध्ये भारताचा पराभव

*विंडीजविरुद्ध १५० धावा करू शकले नाही*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना कॅरेबियन संघाने चार धावांनी जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावत १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला नऊ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या आणि सामना चार धावांनी गमावला. तिलक वर्मा वगळता एकाही भारतीय फलंदाजाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

हा भारताचा २०० वा टी२० सामना होता आणि अशी कामगिरी करणारा टीम इंडिया हा दुसरा संघ आहे. भारतापूर्वी पाकिस्तानच्या संघाने २०० हून अधिक टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने ४८ आणि निकोलस पूरनने ४१ धावा केल्या. ओबेद मॅकॉय, जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. ब्रेंडन किंगने पहिल्याच षटकापासून मोठे फटके खेळायला सुरुवात केली आणि पहिल्या दोन षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या २० धावांच्या पुढे गेली. मात्र, दुसऱ्या टोकाला काइल मेयर्स चाचपडत होता. कर्णधार हार्दिकने पाचवे षटक चहलला दिले आणि त्याने मेयर्सला पायचीत टिपले. चेंडू यष्टीच्या बाहेर जात असतानाही मेयर्सने रिव्ह्यू घेतला नाही आणि तंबूमध्ये परतला. मेयर्सने सात चेंडूंत एक धाव घेतली. पुढच्याच चेंडूवर जॉन्सन चार्ल्सने एकेरी धाव घेतली आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चहलनेही किंगलाही पायचीत टिपले. किंगने १९ चेंडूत २८ धावा केल्या. एकाच षटकात दोन गडी गमावल्याने वेस्ट इंडिजचा संघ दडपणाखाली आला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या पूरनने चार चौकारांसह सुरुवात करत संघाला सामन्यात परत आणले, मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चार्ल्स कुलदीपचा बळी ठरला. तिलक वर्माने अप्रतिम झेल घेत त्याला तंबूमध्ये पाठवले. चार्ल्सने सहा चेंडूत तीन धावा केल्या. यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेलने पूरनसोबत चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरणही हार्दिक पांड्याचा बळी ठरला. पुरणने ३४ चेंडूत ४१ धावा केल्या. पुरणपाठोपाठ हेटमायरही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने १२ चेंडूत केवळ १० धावा केल्या. शेवटी कर्णधार पॉवेलही ३२ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. अर्शदीपने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. अर्शदीपने भारतीय डावाच्या १९व्या षटकात चार वाईड टाकले. यामुळे टीम इंडियाला २० वे षटक वेळेवर सुरू करता आले नाही आणि शेवटच्या षटकात केवळ चार क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर होते. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ त्याचा फायदा उठवू शकला नाही आणि २० षटकांत सहा गडी गमावून केवळ १४९ धावाच करू शकला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. पाच धावांवर संघाची पहिली विकेट पडली. शुभमन गिल नऊ चेंडूत अवघ्या तीन धावा करून अकिल हुसेनचा बळी ठरला. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म स्पिनरने त्याला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमारने प्रथम वेगवान धावा केल्या, पण इशान किशनला विशेष काही करता आले नाही. नऊ चेंडूत सहा धावा करून तो बाद झाला. सूर्यकुमार आणि तिलक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले, पण सूर्याही २१ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात तिलक वर्माही तंबूमध्ये परतला. तिलकने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. कर्णधार हार्दिकसह संजू सॅमसनने भारतीय डाव सांभाळला आणि हे दोघेही टीम इंडियाला विजय मिळवून देतील, असे वाटत होते. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी फक्त ३७ धावा हव्या होत्या आणि सहा विकेट्स शिल्लक होत्या. होल्डरने भारतीय डावातील १६ वे षटक केले आणि पहिल्याच चेंडूवर कर्णधार हार्दिकचा त्रिफळा उध्वस्त केला. हार्दिकने १९ चेंडूत १९ धावा केल्या. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनही धावबाद झाला. संजूने १२ चेंडूत १२ धावा केल्या. पुढील तीन चेंडूंत कुलदीप यादवला एकही धाव करता आली नाही. होल्डरच्या षटकात एकही धाव झाली नाही आणि दोन फलंदाज बाद झाले. इथून टीम इंडिया अडचणीत आली.

भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर आली. त्याने कुलदीपसह पुढच्या दोन षटकांत १६ धावा करत भारताला सामन्यात रोखले. मात्र, १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला आणि भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला. अक्षरने ११ चेंडूत १३ धावा केल्या. त्याला ओबेद मॅकॉयने बाद केले. भारताला विजयासाठी शेवटच्या ११ चेंडूत २१ धावांची गरज होती. अशा स्थितीत अर्शदीपने मॅकॉयच्या दोन चेंडूंत दोन चौकार मारत अंधुक आशा निर्माण केल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. शेफर्डने पहिल्याच चेंडूवर अर्शदीपचा त्रिफळा उध्वस्त केला. चहल आणि मुकेश पुढील पाच चेंडूंमध्ये केवळ पाच धावा करू शकले आणि टीम इंडियाला चार धावांनी सामना गमवावा लागला. सोबतच २००व्या सामन्यात पराभूत होण्याचा कलंकही हार्दिकसह भारताच्या भाळी लागला.

जेसन होल्डरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढचा सामना रविवारी ६ ऑगस्ट रोजी गयाना येथे रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा