You are currently viewing पंडीत संजय गरूड यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध…

पंडीत संजय गरूड यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध…

स्वरांजली” या मैफिलिद्वारे आग्रा घरण्याचे ज्येष्ठ गायक श्री उमेश मेस्त्री यांच्या स्मृतीस उजाळा..

सावंतवाडी 

शुक्रवार दि. २१-०७-२०२३ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी च्या सभागृहात आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. उमेश मेस्त्री यांना श्रद्धांजलीपर “पंडीत संजय गरुड, पुणे” यांच्या “स्वरांजली” या शास्त्रीय उपशास्त्रीय मैफिलीचे आयोजन श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी, अभिनव संगीत विद्यालय, सावंतवाडी संगीत मित्रमंडळ आणि सुरश्री संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अलीकडेच दि. १० जुलै रोजी श्री उमेश मेस्त्री यांचे ठाणे मुक्कामी दुखःद निधन झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व कलाकार आणि श्रोत्यांनी २ मिनिटे स्तब्धता पाळून कै. उमेश मेस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनतर त्यांचे शिष्य श्री किरण सिद्धये यांनी कै उमेश मेस्त्री यांच्या सांगीतिक कारकिर्दी विषयी थोडक्यात माहिती दिली. कै. उमेश मेस्त्री यांना संगीताचे बाळकडू त्यांचे काका कै. रघुनाथ मेस्त्री यांच्या कडून मिळालं. पुढे मुंबई येथे गेल्यानंतर त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दादर येथे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. पंडीत वसंतराव कुलकर्णी यांचेकडे तर आग्रा घराण्याचे शिक्षण कै. पंडीत बबनराव हळदणकर यांच्याकडे अनेक वर्ष झाले. त्यानंतर त्यांनी विक्रोळी येथे अनेक वर्षे संगीताचे वर्ग घेतले. त्यातीलच एक शिष्या पूर्वाश्रमीची सीमा मेस्त्री व आत्ताच्या सौ. सीमा शिरोडकर ह्या आघाडीच्या व ज्येष्ठ वादक असल्याचे सिद्धये यांनी सांगितले.
कै. उमेश मेस्त्री स्वतःच्या गाण्याच्या सदरीकरणा पेक्षा शिष्यांना ग्वाल्हेर व आग्रा गायकीचे शिक्षण देण्यावर भर दिला. त्यांच्याकडे या दोन्ही घरण्यांच्या चीजेचे भांडार असल्याचा उल्लेख श्री निलेश मेस्त्री यांच्या मनोगतात झाला. या व्यतिरिक्त सुरश्री संगीत विद्यालयाच्या सौ मंजिरी धोपेश्वरकर वैभव केंकरे व सुधीर धुमे यांनी त्यांच्याविषयी आठवणी सांगितल्या.
या नंतर पंडीत संजय गरूड, पुणे यांची स्वरांजली ही गायन मैफिल झाली . श्री गरूड हे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे पंडीत श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य त्यामुळे त्यांच्या कडे किराणा घराण्याच्या वारसा आहे. गायन मैफिलीची सुरवात त्यांनी मारुबिहाग रागातील “रसिया हो न जा..” या बडा ख्याल ने केली तर त्याच रागात “तडपत रैन दिना…” हा छोटा ख्याल सादर केला. त्या नंतर उपशास्त्रीय प्रकारात तुम क्या जानो प्रित ही ठुमरी सादर करत शिवरंजनी रागातील “कश्यासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात …” हे भक्तिगीत सादर केले, पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेला व कै. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेवांचा अभंग तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग… कट्यार काळजात घुसली या नाटकातील ” या भवनातील गीत पुराणे…” हे नाट्यपद सादर केले व मैफिलीची सांगता “जो भजे हरी को सदा…” या भैरवीने केली. ही स्वरांजली ही मैफिल सावंतवाडीकरांसाठी पर्वणीच ठरली
या मैफिलीस उत्कृष्ठ साथ संगत हार्मोनियम वर श्री निलेश मेस्त्री यांनी तबलासाथ श्री किशोर सावंत व कु. निरज मिलिंद भोसले यांनी ऑर्गनसाथ कु मंगेश मेस्त्री यांनी दिली, टाळावर साथ श्री नितीन धामापूरकर व कु. केतकी सावंत यांनी दिली तानपुरासाथ सौ. वर्षा धामापूरकर यांनी केली कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन श्री हेमंत मेस्त्री यांनी केले तर निवेदनाची जबाबदारी श्री संजय कात्रे यांनी सांभाळली. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली व विशेष सहाय्य श्री श्रीपाद चोडणकर, कु गोविंद मळगावकर, कु पुरुषोत्तम केळुसकर, कु ऋषिकेश केळुसकर, कु मनीष पवार यांचे लाभले. संगीत श्रोते, पत्रकार मित्र, व श्रीराम वाचन मंदिर यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा