You are currently viewing अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने होणार साजरा…

अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने होणार साजरा…

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती: मुंबई- गोवा महामार्गावर वृक्षरोपण

सावंतवाडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात मुंबई-गोवा महामार्गावर वृक्ष लागवड मोहीम, मॅरेथॉन स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्या वाटप आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.

दरम्यान रायगड येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेमका कार्यक्रम किंवा उपक्रम कसे राबावेत याबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. त्यामुळे वरिष्ठांची चर्चा करून समाज उपयोगी उपक्रम राबविले जातील,असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार मिळाल्यानंतर श्री. नाईक यांनी आज पासून जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली व आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी श्री. नाईक म्हणाले, या ठिकाणी २२ जुलैला अजित पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचा कार्यक्रम धुमधडाक्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु रायगड येथे घडलेल्या घटनेनंतर यात काहीसा बदल करण्यात आला आहे. मात्र समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई-गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा