एकजण किरकोळ जखमी तब्बल १८ तासानंतर दुचाकी शोधण्यात यश
मालवण
मालवण तालुक्यातील चाफेखोल ते वडाचापाट दरम्यानच्या चाफेखोल माळवाडी नजीक असलेल्या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात दुचाकी वाहून जाण्याची दुर्घटना काल मंगळवार दिनांक १८ जुलै रोजी सायंकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. यात दुचाकीवरील दोन तरूण सुदैवाने वाहून जाण्यापासून बचावले परंतु एकास किरकोळ दुखापत झाली आहे. तर आज सकाळी ११ वाजता म्हणजे सुमारे १८ तासानंतर वाहून गेलेली सदर दुचाकी ओढ्यात पुलापासून सुमारे ५० मीटरवर शोधमोहीम राबविणाऱ्या स्थानिक तरुणांना आढळून आली.
नांदोस गावठणवाडी येथील विनोद माळकर आणि सतिश जाधव हे दोघेजण स्वतःच्या ताब्यातील मोटरसायकल ( MH – 07 – AQ – 5372 ) ही घेऊन बागायत येथे डॉक्टर कडे आले होते. तेथून पुन्हा गोळवण येथे घरी परतत असताना सायंकाळी साडेतीन वाजता चाफेखोल वडाचापाट मार्गावरील चाफेखोल माळवाडी नजिकच्या छोट्या पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून दुचाकीसह पुल पार करत असताना पाण्याच्या प्रवाहात अचानक अजून वाढ झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून मोटारसायकल पाण्यातून वाहून जावू लागली. तेव्हा सतिश जाधव आणि विनोद माळकर यांनी गाडी ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांना अपयश येवून दुचाकी पुलावरून ओढ्यात पडली. तरीही श्री. माळकर यांनी दुचाकी सोडली नव्हती, शेवटी पाण्याचा तीव्र प्रवाह आणि खोलीमुळे त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुचाकी सोडून दिली आणि पोहत बाहेर आले. परंतु यामध्ये त्यांच्या पायांना आणि हाताला दुखापत झाली . यावेळी अवघ्या सहा महिन्यांपुर्वी घेतलेली नवीन मोटरसायकल डोळ्यादेखत वाहून जाताना पाहून वाहन मालकांना मात्र दु:ख होत होते. त्यानंतर त्यांनी व चाफेखोल माळवाडी येथील स्थानिक तरुणांनी ओढ्यामध्ये दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला. पण मुसळधार कोसळणारा पाऊस आणि ओढ्यातील पाण्याचा मोठा प्रवाह यामुळे पाण्यात उतरून दुचाकी शोधणे शक्य झाले नाही. त्यामुळे ओढ्याच्या कडेने शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पण सायंकाळी उशीरा पर्यंत दुचाकी सापडू शकली नाही.
दरम्यान आज बुधवार दिनांक १९ रोजी सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा स्थानिक तरुण आणि नांदोस येथील तरुणांनी घटनास्थळापासून ओढ्यात दुचाकीचा शोध घेण्यास सुरुवात केली. कालच्या तुलनेने आज पाण्याचा प्रवाह कमी असल्याने शोध घेणे सोपे झाले. अखेर तरुणांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पुलापासून सुमारे ५० मीटर अंतरावर दहा फूट खोल पाण्यात मोटरसायकल आढळून आली. काल सायंकाळी ४ वाजता वाहून गेलेली मोटरसायकल तब्बल १८ तासांनंतर ओढ्यात आढळून आली त्यावेळी दुचाकीचेही नुकसान झाल्याचे दिसून आले. सदर वाहून गेलेली दुचाकी शोधण्यासाठी मिलिंद जाधव, ओंकार जाधव, साईप्रसाद जाधव, गजानन जाधव, संतोष जाधव , पिंटू वरक , संकेत पाटील, गौरव चिरमुले , अक्षय ढोलम , निलेश माळकर , विशाल करावडे , कुणाल नांदोसकर या तरुणांनी ओढ्यात उतरून प्रयत्न केले आणि आज दुचाकी शोधण्यात यशस्वी झाले.