जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द

 – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आणि कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले.  जिल्हा मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेला सिंधुदुर्ग जिल्हा कायम पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहील अशा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री म्हणाले की, आपला जिल्हा सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील आदर्श पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुया, जिल्ह्याच्या पर्यटनाला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीच जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू होत आहे. या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हा विमानतळ कार्यान्वीत होणार आहे. जिल्हावासियांचे विमानतळाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. जिल्ह्यात पंचतारांकीत हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून ताज हॉटेल्ससारखे प्रकल्प आता जिल्ह्यात येणार आहेत. याविषयीचा करारही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. येत्या 15 दिवसात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. या स्मारकाच्या जागेचा प्रलंबित असलेला प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाचाही विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यंदाच्या वर्षी 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या कठीण काळातही जिल्हावासियांनी नियमांचे योग्य पालन करून प्रशासनास साथ दिली आहे. त्याबद्दल मला जिल्हा वासियांचे कौतुक आहे. जिल्हावासियांच्या योग्य नियम पालनामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव कमी राखण्यात यश आले आहे. आता कोरोनाच्या लसीकरणाचाही शुभारंभ जिल्ह्यात झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना, दुसऱ्या टप्प्यात पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस घ्यावी असे आवाहनही  पालकमंत्री यांनी यावेळी केले.

        मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्याच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी (सन 2019-2020) मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयांना प्रशस्तीपत्रक तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सन्मानपत्र देऊन आणि महाकृषी पंप उर्जा अभियांनातर्गंत लाभार्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते  मागणीपत्र देऊन गौरविण्यात आले.

       ध्वजारोहणानंतर पोलीस दलातील पुरुष, महिला पोलीस प्लाटुनने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर झालेल्या संचलनामध्ये पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, जलद प्रतिसाद दल, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, वेंगुर्ला नगर परिषदेचे अग्नीशमन दल आदींनी सहभाग नोंदवला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी उपोषण करीत असलेल्या उपोषणकर्तांची भेट घेऊन त्यांची आत्मियतेने चौकशी करुन संबंधितांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे प्रशासनाला आदेश दिले.

       तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुंभागी साठे, व जिल्हा मुख्यालयातील सर्व कार्यालयाचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा