अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करा – अर्चना घारे परब
सावंतवाडी
तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. यात तिघांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधितांवर संशयितांसह हा प्रकार पाठिशी घालणाऱ्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज येथील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान या प्रकाराला १८ दिवस होवून सुध्दा तपास का झाला नाही…? असा सवाल करीत या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, असे अर्चना घारे यांनी सांगितले.
तालुक्यात एका गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. याबाबतची तक्रार तिच्या वडिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र या घटनेला तब्बल आठवडा उलटला तरी संबंधित संशयित ताब्यात घेण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. परंतु पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला नाही, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे त्यामुळे याप्रकरणी संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सौ. घारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आज येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी त्यांनी ऋषिकेश अधिकारी यांच्याशी चर्चा केली व संबंधित संशयिताला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली व नेमका त्यांनी तपास करण्यास उशीर का लावला, याबाबत चौकशी करा, अशी मागणी यावेळी केली. दरम्यान याबाबत श्री. अधिकारी यांनी याप्रकरणी आपण तात्काळ गुन्हा दाखल करू व संशयिताला ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच गुन्ह्याचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, जिल्हाध्यक्ष युवती सावली पाटकर, जहुर खान, राजकुमार राऊळ, अशोक लातीये, निलेश लातिये, विशाल राऊळ, संतोष राऊळ, सूर्यकांत राऊळ, अरविंद घाडी, संतोष राणे, संतोष लातये, सरिता राऊळ, प्रज्ञा राणे, सायली शिंदे, वैष्णवी राऊळ, विजया राऊळ, आदी उपस्थित होते.