मुंबई
भारतीय जनता पार्टीचे नेते कोरोना महामारीच्या काळातही धर्माच्या आडून गलिच्छ राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप मुंबईचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी केला आहे. बुधवारी प्रसारीत केलेल्या एका व्हिडियोत ना. अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांना प्रश्न विचारलेत की, देश कोरोनामुक्त झाला आहे का..? देशातील परिस्थिती सामान्य झाली आहे का..? कोरोना विषाणूवर लस निघाली आहे का..? जर या सर्व प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर या महामारीच्या काळात भाजपाचे आपला धार्मिक अजेंडा का चालवत आहेत..?_
_ना.अस्लम शेख पुढे म्हणाले की, धर्मावर आधारित घाणेरडं राजकारण करुन भारतीय जनता पार्टीचे नेते नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मुद्द्याच्या आडुन देखील भाजपाने आपला धार्मिक व राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचं काम केलं होतं. आताही परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता भाजपाचे नेते छटपूजेच्या मुद्द्यावरुन राजकारण करत आहेत._
_कोरोना संक्रमण काळात आलेला प्रत्येक सण सर्व धर्मांच्या लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांततेने व संयमाने साजरा केला. कोणताही सण साजरा करत असताना कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाला घेणं आवश्यक असतं. छटपूजे संदर्भातला निर्णय देखील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घेण्यात आलेला आहे. पण नागरिकांच्या जीविताशी कोणतही देणं-घेण नसणारे भाजपाचे नेते वास्तववादी मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धर्माचा आधार घेऊन समाजात विष पसरवत आहेत._