You are currently viewing अजित पवारांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक मधील वाद आला पुन्हा उफाळून..

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक मधील वाद आला पुन्हा उफाळून..

पवारांच्या वक्तव्यावर येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली…

 

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक मधील वाद उफाळून आलाय.

 

मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना, ‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,’ असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

 

परंतु अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमेलगतच्या वादग्रस्त बेळगाव, कारवार आणि निपाणी या गावांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या रागाचा पार चढलाय.

 

‘मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची निंदा करतो. जगाला माहीत आहे की महाजन समितीच्या अहवालात शेवटी काय निर्णय झाला होता. या पद्धतीची वक्तव्यं चुकीची आहेत’ असं येडियुरप्पा यांनी म्हटलंय.

 

‘आम्हाला महाजन समिती अहवालावर संपूर्ण विश्वास आहे. ज्यानुसार, बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याची आम्ही निंदा करतो. याबद्दल आम्ही निश्चितच पत्र लिहिणार आहोत’ असंही येडियुरप्पा यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + fifteen =